गुंजाळवाडी येथे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते स्लॅब कामाचे पूजन
◻️ त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिर बांधकामाला सुरुवात
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील निर्मलनगर परिसरात त्रिपुरारी पौर्णिमेच्या मुहूर्तावर श्री दत्तमंदिर आणि सद्गुरू नारायण महाराज (नारायणपूर) मंदिराच्या गर्भगृहाच्या स्लॅबच्या कामाचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते विधिवत पूजनाने करण्यात आला.
धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व असलेल्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या मंगलमय वातावरणात या महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात झाल्याने परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सद्गुरू नारायण महाराज यांच्या आध्यात्मिक विचारांचा आणि भक्तिमार्गाचा वारसा जपण्याच्या उद्देशाने निर्मलनगर येथे हे भव्य मंदिर साकारले जात आहे. गर्भगृहाच्या स्लॅब भरणीच्या कामामुळे मंदिराच्या उभारणीला आता अधिक वेग येणार असून, लवकरच भाविकांना दर्शन आणि धार्मिक उपासनेसाठी सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार आहे.
दरम्यान या सोहळ्याप्रसंगी बापूसाहेब देशमुख, पोपट वर्पे, राजेंद्र देशमुख, गणेश आंबरे, संपत गुंजाळ, योगेश गुंजाळ, अशोक कादळकर, अण्णासाहेब गुंजाळ, संकेत गुंजाळ, मधुकर गुंजाळ, रणजीत गुंजाळ, बाबासाहेब देशमुख यांच्यासह श्री दत्त मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.