परिवर्तनाचे दोन वर्षे; संगमनेरच्या विकासाचा नवा ‘अमोल’अध्याय!

संगमनेर Live
0
परिवर्तनाचे दोन वर्षे; संगमनेरच्या विकासाचा नवा ‘अमोल’अध्याय!

◻️ आमदार अमोल खताळ यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचा लेखाजोखा!


 संगमनेर LIVE (अनिल शेळके) | ​संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात २०२४ मध्ये ऐतिहासिक परिवर्तन घडवत जनतेने युवा नेतृत्व आमदार अमोल खताळ पाटील यांच्यावर विश्‍वास दाखवला. गेल्या दोन वर्षांचा त्यांचा प्रवास पाहता परिवर्तनाच्या अपेक्षा, विकासाची सुस्पष्ट दिशा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचे प्रामाणिक प्रयत्न या बाबी प्रकर्षाने दिसून येतात. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना थेट हात घालत, महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी खेचून आणत आमदार खताळ यांनी संगमनेरच्या विकासाला नवी गती दिली आहे.

​लोकप्रतिनिधीच्या कामाचे खरे मूल्यमापन केवळ पोकळ घोषणांवर होत नसते; तर एखादे काम मंजूर होणे, त्याला निधी उपलब्ध होणे, ते दर्जेदार पध्दतीने पूर्ण होणे आणि जनतेला त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळणे या प्रत्येक टप्प्याला महत्त्व असते. विशेष म्हणजे, विकासकामांत दिरंगाई करणाऱ्या किंवा दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा कडक इशारा देत आमदार खताळ यांनी कामाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

​मतदारसंघातील ग्रामीण भागाची संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी रस्ते, पूल आणि अंतर्गत पायाभूत सुविधांच्या कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने तालुक्यात तब्बल १०२ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या विकासप्रवासात मिर्झापूर-धांदरफळ खुर्द रस्त्यासाठी सुमारे ६ कोटी ५९ लाख ६६ हजार रुपये, तर चंदनापुरी-शिरापूर पुलासाठी सुमारे ३ कोटी २४ लाख ७० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासोबतच देवकौठे येथे १ कोटी ६ लाख रुपये, निमजसाठी ८९ लाख रुपये आणि सामाजिक विकास योजनेअंतर्गत ५५ लाखांचा निधी मंजूर करून कामांना सुरुवात करण्यात आली असून, प्रलंबित साकूर-बिरेवाडी रस्त्याचे कामही मार्गी लागले आहे.

​संगमनेर तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाई व अनियमित पावसाचा सामना करावा लागतो. शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था पाण्यावर अवलंबून असल्याने सिंचन योजना आणि पाणीपुरवठा हे विषय आमदार खताळ अत्यंत सक्षमपणे हाताळत आहेत. विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या साकूर उपसा सिंचन योजनेसाठी सुमारे २१७ कोटी रुपये, भोजापूर चारीसाठी सुमारे ४५ कोटी रुपये आणि घुलेवाडी पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे ४२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तसेच, भोजापूर मध्यम प्रकल्पाचा नदीजोड प्रकल्पात समावेश करून सरकारकडून शब्दपूर्ती करण्यात आली आहे. खांबा परिसरातील कामधेनू उपसा सिंचन योजना वेळेत पूर्ण करून पाण्याचा प्रत्येक थेंब शेतापर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, दुष्काळी परिस्थितीत टॅकरद्वारे पाणीपुरवठा, चारा उपलब्धता आणि विहीर पुनर्भरणासाठी प्रशासनाशी समन्वय साधला जात आहे.

​संगमनेरची अर्थव्यवस्था शेती, ऊस, दुग्धव्यवसाय आणि भाजीपाला पिकांवर आधारित आहे. नैसर्गिक आपत्ती आणि बाजारभावातील चढ-उतार यांमुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने उभी राहतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कृषी योजनांचा लाभ, अखंडित वीजपुरवठ्यासाठी शहरासह परिसरात नवीन ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राचा पाठपुरावा, शेतीमाल प्रक्रिया उद्योग, शीतगृहांची उपलब्धता आणि तरुण शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.

​ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा जवळच्या परिसरात मिळावी, यासाठी आमदार खताळ आग्रही आहेत. महिला व बालकांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी महायुती सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू असून, दुर्गम भागातील वैद्यकीय सुविधा सुधारण्यासाठी तालुक्यात नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळाली आहे व त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. यासोबतच सामाजिक सुरक्षिततेला प्राधान्य देत महिलांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन अवैध धंद्यांविरोधात प्रशासनासोबत थेट मैदानात उतरून कारवाई करण्याची धडाडी त्यांनी दाखवली आहे.

​शिक्षण पूर्ण करूनही स्थानिक पातळीवर रोजगार नसल्याने तरुणांना मोठ्या शहरांकडे स्थलांतर करावे लागते. हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून पठार भागातील कोठे मलकापूर येथे औद्योगिक वसाहतीसाठी (एमआयडीसी) जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय स्थानिक शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करत सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन देण्याचा अन्यायकारक करारनामा रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करून त्याला तात्काळ स्थगिती मिळवून दिली. आगामी काळात एमआयडीसी उभारणीतून स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

​ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदारांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एस.टी. महामंडळाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला. या प्रयत्नांतून संगमनेर आगाराला १५ ‘लालपरी’ आणि ‘जिजाऊ’ एस.टी. बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असून, अत्याधुनिक २५ इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस मंजूर झाल्या आहेत, ज्यापैकी ११ इलेक्ट्रिक बसेस सध्या प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. याशिवाय लोहारे, निळवंडे, मांची फाटा, वडगाव पान, धांदरफळ बुद्रुक-खुर्द आणि वरवंडी फाटा या ठिकाणी अद्ययावत प्रवासी निवारे उभारण्यात येत आहेत.

​संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळांच्या विकासाला चालना देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला गती दिली जात आहे. निझर्णेश्‍वर, पेमगिरी आणि बाळेश्‍वर यांसारख्या पर्यटनस्थळांच्या विकासासोबतच धांदरफळ येथील श्री बिरोबा महाराज मंदिर परिसरात रस्त्यांचे काॅक्रीटीकरण आणि पथदिव्यांची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी स्वच्छता, पिण्याचे पाणी, वाहनतळ आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल राखला जात आहे.

​महसूलविषयक प्रश्न, शासकीय दाखले, वीज, पाणी आणि विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार खताळ हे प्रशासन आणि नागरिकांमधील भक्कम दुवा म्हणून कार्य करत आहेत. अतिक्रमण हटाव मोहिमेसारख्या संवेदनशील विषयातही गरीब व सामान्य नागरिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी प्रशासनाने मानवी दृष्टिकोन ठेवावा अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.

​गेल्या दोन वर्षांच्या अल्प कालावधीत आमदार अमोल खताळ यांनी विकासकामांचा वेग, कामांचा दर्जा आणि सर्वसामान्यांच्या जीवनात होणारा सकारात्मक बदल यावर लक्ष केंद्रित केले आहे. अर्थात, पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात, दर्जेदार रस्ते, आरोग्य व स्थानिक रोजगार हे प्रवास अजून पुढे न्यायचे आहेत. दोन वर्षांचा हा यशस्वी टप्पा आत्मपरीक्षणाची आणि नव्या संकल्पाची संधी आहे. जनतेने टाकलेला विश्‍वास सार्थ ठरवत संगमनेरच्या सर्वांगीण विकासाचा हा रथ यापुढेही असाच वेगाने धावत राहील, यात शंका नाही.

माहिती संकलन - गोरक्ष नेहे (जनसंपर्क अधिकारी, आमदार अमोल खताळ)
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !