येणारा काळ अधिक आव्हानात्मक, पाण्याचा अपव्यय टाळा - मंत्री विखे पाटील
◻️टंचाई आढावा बैठकीत रखडलेल्या पाणी योजनांवरून अधिकाऱ्यांची कानउघाडणी
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | धरणामध्ये उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून आवर्तनाचा लाभ देण्याचा प्रयत्न झाला असला तरी, उद्याचा काळ अधिक आव्हानात्मक असणार आहे. पुढची आवर्तन ही फक्त पिण्याच्या पाण्यासाठी होतील. पाण्यासह खर्चाची सुध्दा बचत करा. चारा उत्पादनाचे नियोजन करण्यासाठी कृषी सहाय्यक आणि पशुवैद्यकीय अधिकार्यांनी समन्वयातून गावात सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. टंचाई परीस्थीतीच्या पार्श्वभूमीवर लोकांची अडचण दूर करण्यासाठी भविष्यात सर्व बैठका विभागनिहाय घेणार असल्याची माहीती त्यांनी दिली.
मागील महिन्यात टंचाई आढावा बैठकीत केलेल्या सूचनांची प्रशासनाने केलेली कार्यवाही आणि झालेल्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याकरीता मंत्री डॉ. विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला अतिरीक्त जिल्हाधिकारी तुकाराम हुलहूळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसिलदार अमोल मोरे, कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, ज्ञानेश्वर गोंदकर, नगराध्यक्षा सौ. जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके यांच्यासह शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील यांनी टंचाई आढावा बैठकीच्या निमित्ताने तालुक्यातील गावनिहाय पाणी परिस्थिती चारा टंचाई, पाणी पुरवठा योजनांच्या समस्या जाणून घेतल्या. गावातील समस्यांच्या संदर्भात कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचनेची तसेच मागणीची दखल घेवून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पाणी पुरवठा योजनांच्या समस्या अद्यापही सुटत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. साकुरी गावाच्या पाणी पुरवठा योजनेचे ऐंशी टक्के काम पूर्ण झाले. मात्र उरर्वित काम रखडल्याने पाणी मिळू शकत नसल्याची बाब बैठकीत निदर्शानास आणून देण्यात आली.
सद्य परिस्थितीत गोदावरी निळवंडे धरणातून सोडलेल्या आवर्तनाचा मोठा दिलासा मिळवून दिल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांचे बैठकीत विशेष अभिनंदन करण्यात आले. मात्र याच दरम्यान मंत्री विखे पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य उपस्थित शेतकर्यांच्या निदर्शनास आणून दिले. धरणात पाणी उपलब्ध होते म्हणून आवर्तन होवू शकली. पण पुढचा काळ अतिशय आव्हानात्मक असून, पुढची आवर्तन झालीच तर ती फक्त पिण्याच्या पाण्याची होतील. त्यामुळे पाण्याचा अपव्यय करू नका आशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना दिल्या. मुळा आणि कुकडीचे आवर्तन सुरू आहे. मात्र कुठेही अनधिकृत पाणी उपसा होवू देवू नका. आवर्तनाच्या कालावधीत अधिकाऱ्यांनी गांभीर्याने याची दखल घेण्याचे निर्देश बैठकीत दिले. वाकडी, चितळी, आडगाव आदी गावातील ग्रामस्थांनी सूचना केला.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधन हा एकमेव आधार ग्रामीण भागाला ठरणार आहे. पशुधन वाचविण्यासाठी प्रशासनाने तेवढ्याच संवेदनशीलतेने काम करण्याच्या सूचना करून गावपातळीवर पशुधन पशुपालक आणि चारा उत्पादन करण्यासाठी इच्छूक असलेल्या शेतकऱ्याचा माहीती अद्यापही संकलित झाली नसल्याची नाराजी मंत्री विखे पाटील यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांबद्दल व्यक्त केली.
प्रत्येक गावात कृषि सहाय्यक आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे सर्व्हेक्षण करून चारा उत्पादनाचे नियोजन करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. उपलब्ध झालेले पाण्यातून रब्बीला आधार मिळेल पण चारा उत्पादनासाठी आवर्तनाचा लाभ करून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
महायुती सरकारने कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. पन्नास हजार रुपयांचांच्या अनुदान मंजूर झालेल्या शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या प्राप्त झाल्या आहेत. मात्र बॅका अधिकचे व्याज घेत असल्याच्या तक्रारी बैठकीत मंत्र्यांकडे करण्यात आल्या. याबबात तालुका विकास अधिकाऱ्यांनी बुधवारी विशेष बैठक घेवून शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन करावे. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी कार्यालयात थांबून गावनिहाय वीज प्रश्नाचे निराकरण करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.
नव्याने आलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागाने प्राधान्यक्रम निश्चित करावा. दर महीन्याला आढावा घेतला जाणार असून पुढच्या बैठका विभागनिहाय घेण्यात येतील. टंचाईच्या परीस्थीतीत लोकांना आधार देण्याचे धोरण महायुती सरकारचे आहे. इतर सर्व खर्चांना फाटा देवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली फक्त दुष्काळी परीस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व काम सुरू असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
पाण्याबरोबर खर्चावर सुध्दा नियंत्रण आणण्याचे आवाहन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, विवाह सोहळ्याच्या खर्च कमी करा. पन्नास लोकांमध्ये समारंभ करा, राहाता तालुक्याने याची सुरूवात करून राज्यासमोर आदर्श निर्माण करून देण्याचे आवाहन पुन्हा एकदा बैठकीत केले.