​मानव-बिबट संघर्ष रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
मानव-बिबट संघर्ष रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा - आमदार अमोल खताळ

◻️​ वनविभागाच्या निझर्णेश्‍वर, पेमगिरी व बाळेश्‍वर येथील वनपर्यटन विकासकामांचा आढावा


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर तालुक्यात मानव-बिबट संघर्षाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी वनविभागाने अधिक सतर्क राहून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सदैव सज्ज ठेवावी, अशा स्पष्ट सूचना आमदार अमोल खताळ यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

​संगमनेर येथील सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक) कार्यालयात शुक्रवारी (दि. २०) आमदार खताळ यांनी वनविभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीस सहाय्यक वनसंरक्षक अमरजित पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन ताम्हाणे, नम्रता हिरे यांच्यासह वनपाल, वनरक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वनविभागाला बिबट बचाव वाहने, ड्रोन, बंदुका आणि पिंजरे यांसारखी आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. बिबट्यांचा वावर असलेल्या भागात नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत या साधनसामग्रीचा प्रभावी वापर करावा आणि सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश आमदार खताळ यांनी दिले.

वन्यजीवांना पाण्यासाठी मानवी वस्त्यांकडे यावे लागू नये, यासाठी जंगल परिसरातील पाणवठे सुस्थितीत ठेवून पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. यासोबतच प्रस्तावित वनभवन इमारतीचे काम आणि निझर्णेश्‍वर, पेमगिरी व बाळेश्‍वर येथील वनपर्यटन विकासकामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन ही कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दरम्यान, बिबट्यांना सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेल्या संगमनेरच्या ‘बिबट बचाव पथका’ने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पथकाचा सत्कार करण्यात आला. तर, आपत्कालीन परिस्थितीत या पथकाने अधिक दक्षतेने कार्य पार पाडावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !