डॉ. सुजय विखे पाटील पहिल्या महिन्यांचे मानधन ‘स्नेहालय’ संस्थेला देणार!
◻️ जिल्हा बॅक अध्यक्षपद कार्यकाळात दरमहा विविध सेवाभावी संस्थांना मिळणार आर्थिक बळ
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्तुत्य आणि समाजोपयोगी निर्णय घेतला आहे. अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मिळणारे पहिल्याच महिन्याचे संपूर्ण मानधन त्यांनी अहिल्यानगरमधील ‘स्नेहालय’ या सामाजिक संस्थेला देण्याचे जाहीर केले आहे.
विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ एका महिन्यापुरता मर्यादित न ठेवता, आपल्या संपूर्ण कार्यकाळात दरमहा मिळणारे मानधन जिल्ह्यातील विविध सामाजिक व सेवाभावी संस्थांना देण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे.
सार्वजनिक पदावर काम करताना मिळणाऱ्या मानधनाचा विनियोग समाजातील वंचित, निराधार आणि गरजू घटकांच्या कल्याणासाठी व्हावा, ही या निर्णयामागील मुख्य भूमिका आहे. अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या ‘स्नेहालय’सारख्या संस्थांना प्रत्यक्ष आर्थिक बळ मिळावे, या उद्देशाने डॉ. विखे पाटील यांनी या उपक्रमाची सुरुवात केली आहे.
जिल्हा बॅकेच्या माध्यमातून शेतकरी आणि सहकार क्षेत्राच्या प्रश्नांवर काम करण्याची मोठी जबाबदारी सांभाळतानाच, डॉ. विखे पाटील यांनी सामाजिक बांधिलकीही जपली आहे.
दरम्यान, त्यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या कार्याला प्रोत्साहन आणि आर्थिक आधार मिळणार असून, सर्वच स्तरांतून या निर्णयाचे स्वागत होत आहे.