कार्तिकी एकादशीनिमित्त साईनगरीत भक्तीचा महापूर!

संगमनेर Live
0
कार्तिकी एकादशीनिमित्त साईनगरीत भक्तीचा महापूर!

◻️५० हजारांहून अधिक भाविकांनी घेतला साबुदाणा खिचडी महाप्रसादाचा लाभ


संगमनेर LIVE (​शिर्डी) | श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्तव्यवस्थेच्या वतीने कार्तिक शुध्द एकादशीनिमित्त (शके १९४८) शनिवारी, दि. २१ नोव्हेंबर रोजी ‘कार्तिकी एकादशी’ उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने भाविकांसाठी आयोजित केलेल्या महाप्रसादाचा ५० हजारांहून अधिक साईभक्तांनी लाभ घेतला.

​उत्सवानिमित्त श्री साईप्रसादालयात भाविकांसाठी साबुदाणा खिचडीच्या विशेष महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. सकाळच्या सत्रात २४ हजार ९३१ भाविकांना अन्नपाकिटांचे वाटप करण्यात आले, तर दिवसभरात हा आकडा ५० हजारांच्या पार गेला. या महाप्रसादासाठी संस्थानच्या वतीने ५५ पोती साबुदाणा, ४० पोती शेंगदाणे, ७८० किलो शेंगदाणा तेल आणि २ हजार ६८५ किलो बटाटे वापरून सुसज्ज नियोजन करण्यात आले होते.

दरम्यान, उत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील व्यासपीठावर ह.भ.प. उत्तम महाराज गाडे (वैजापूर) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. त्यानंतर रात्री ९.१५ वाजता शिर्डी गावातून श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, पालखी समाधी मंदिरात परतल्यानंतर श्रींची शेजारती संपन्न होईल.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !