नगर : काल प्रोफेसर कॉलनी चौकातील भाजी - फळ विक्रेत्यांसाठी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांची भेट घेण्यात आली होती. आज सकाळी पुन्हा महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने या विक्रेत्यांवर कारवाई सुरू करण्यात आली होती. याबाबत माहिती मिळताच काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी महापौर दीप चव्हाण,चंद्रकांत उजागरे, दानिश शेख त्याचबरोबर शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, माजी महापौर अभिषेक कळमकर, गिरीश जाधव, परेश लोखंडे आदी प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये पोहोचले.
यावेळी काँग्रेस - शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची अतिक्रमण विभागाच्या पथकाशी शाब्दिक चकमक उडाली. यानंतर काँग्रेस - शिवसेनेचे संयुक्त शिष्टमंडळ महानगरपालिकेमध्ये आयुक्तांच्या भेटीसाठी दाखल झाले. मात्र आयुक्त हे महापालिकेत उपस्थित नसल्यामुळे अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या समवेत शिष्टमंडळाने चर्चा केली.
यावेळी काँग्रेस - शिवसेनेच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी आक्रमक होत महापालिकेच्या या अन्यायकारक कारवाईबद्दल अतिक्रमण विभाग प्रमुख यांना धारेवर धरले. सध्या कोरोनाच संकट आहे. यामुळे समाजातील छोट्या-मोठ्या सगळ्याच व्यवसायिक यांची परिस्थिती आर्थिक दृष्ट्या खालावलेली आहे.
दिवसभरात मिळणाऱ्या रोजंदारी वरती गुजराण करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना महानगरपालिका जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आला. यावेळी भाजी - फळे विक्रेते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक दुकानदार, रहिवाशी आणि भाजी फळविक्रेते यांनी समन्वयाने एकमेकाचा एकमेकाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी काम करावं. अडचणीच्या कालावधीमध्ये समाजाच्या सगळ्या घटकांनी एकमेकांना सहकार्याची भूमिका ठेवावी, त्याचबरोबर महानगरपालिकेने देखील अन्यायकारक कारवाई करत लोकांना बेरोजगार करू नये अशी भूमिका यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने घेण्यात आली.
किरण काळे यांचा महानगरपालिकेला इशारा
कोरोना संकट काळात जर नगर शहरातील गोरगरीब, सर्वसामान्य छोटे व्यवसायिक, भाजी, फळ विक्रेते यांना महानगरपालिकेने त्रास देत त्यांना बेरोजगार केले तर महानगरपालिके वर शहरातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच छोट्या व्यावसायिकांचा भव्य मोर्चा काढला जाईल, असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी महानगरपालिकेला दिला आहे.