महाराष्ट्र : माझ्या वर आरोप झाल्यानंतर मी वारंवार माझी भूमिका पक्षाला सांगितली होती. मात्र, माझं पक्षात कोणी ऐकलं नसल्याने नाईलाजाने मला जनतेच्या दरबारात जावं लागलं, अस मत भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर व्यक्त केले आहे.

भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीर टीका करुन संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती. यावर फडणवीस यांनी खडसे दाऊद प्रकरणात नव्हे तर भोसरी जमीन प्रकरणात अडचणीत आल्याचं म्हटलं होतं. यावर खडसे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की भोसरीची जमीन ही एमआयडीसीची नव्हती. आजही ती मूळ मालकाच्या नावावर आहे, मी महसूलमंत्री राहिलो असल्याने मला त्यातील कायदेशीर ज्ञान आहे, जी जमीन खरेदी करण्यात आली आहे. ती माझ्या पत्नीच्या नावाने खरेदी करण्यात आली आहे. तीही नियमानुसार शुल्क भरून खरेदी करण्यात आलेली आहे.
त्यात जाणीवपूर्वक मला त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला. इतरांवर आरोप होताच त्यांना लागलीच क्लिन चिट देण्यात आल्या होत्या. मात्र, माझ्यावर आरोप सिद्ध झाले नव्हते तर मला एकट्याला क्लिन चिट का दिली गेली नाही. विधानसभेत सुद्धा शेवटच्या भाषणात मी सांगितलं होतं. मला आरोप घेऊन बाहेर जायचे नाही. मात्र, मला त्यावेळी ही विश्वासात घेतले गेले नाही. आता फडणवीस म्हणत आहेत एकत्रित चौकशी केली जाईल हे अगोदरच सांगितलं असतं तर मला आज महाराष्ट्रातील जनतेसमोर अस जावं लागलं नसतं.