खासगी रुग्णालयातून आकारल्या जात असलेल्या शुल्काचे प्री-ऑडिट करा | विभागीय आयुक्त गमे

संगमनेर Live
0

  अहमदनगर : सप्‍टेंबर - कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने ज्या भागात रुग्ण जास्त प्रमाणात सापडत आहेत, तेथील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे संभाव्य रुग्णांपर्यंत पोहोचून तात्काळ उपचार देता येत आहेत. प्रशासन आणि आरोग्य विभागाची ही लक्ष्य निर्धारित करुन चाचण्यांची पद्धत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन नाशिक महसूल विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. त्याचबरोबर,  महानगरपालिका क्षेत्रात अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी  दिल्या. खासगी रुग्णालयातून आकारल्या जात असलेल्या शुल्काचे प्री-ऑडिट करण्याची सूचना त्यांनी केली.




          



विभागीय आयुक्त गमे यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती तसेच महसूल विषयक बाबींचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आरोग्य उपसंचालक डॉ. पट्टणशेट्टी, अपर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आदींसह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

          यावेळी श्री. गमे यांनी जिल्ह्यातील कोरोना बाबतची सद्यस्थिती जाणून घेतली. कोणत्या भागातून किती रुग्ण येत आहेत, रुग्ण वाढण्याची कारणे, कोणत्या वयोगटातील रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत, जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड हेल्थ सेंटर आदींची माहिती, जिल्ह्यात असणारी व्हेंटिलेटरची उपलब्धता आदींची माहिती घेतली. याशिवाय, खासगी प्रयोगशाळांतून केली जाणारी कोरोना तपासणी, अॅंटीजेन चाचण्या आणि आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण आदींची माहितीही त्यांनी घेतली.

          जिल्ह्यात विविध हॉस्पिटलमधील बेडसची उपलब्धता नागरिकांना कळावी यासाठी सुरु करण्यात आलेल्या covidbed.ilovenagar.com या पोर्टलचेही त्यांनी कौतुक केले. जिल्ह्यात नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण मोठ्या प्रमाणात करण्यात यावे, ज्या नागरिकांना सर्दी, ताप, खोकला असे आजार असतील, त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी पाठविण्यात यावे. प्रशासनाच्या इतर यंत्रणांतील कर्मचारी यांचा या सर्वेक्षणासाठी उपयोग करण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली.


          खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणार्‍या तक्रारींचा निपटारा कशा प्रकारे होतो, हे त्यांनी जाणून घेतले. जिल्हा प्रशासनाने यासाठी विविध पथकांची नेमणूक केल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी दिली. त्यावर विभागीय आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. सहकार विभागाकडे ऑडिटर मोठ्या प्रमाणात असतात. त्यांची याकामी मदत घेण्यात यावी आणि अशा शुल्कांचे प्री-ऑडिट करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

          जिल्ह्याला सध्या आवश्यक असलेला ऑक्सीजन पुरवठा कमी पडू नये, यासाठी थेट उत्पादक कंपनीशी संपर्क करुन तो मिळविण्याचा प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी केली. इतर औषधांच्या उपलब्धतेबाबतही त्यांनी चर्चा केली.





          जिल्हा रुग्णालय आणि कोविड सेंटरला भेट

विभागीय आयुक्त श्री. गमे, आरोग्य उपसंचालक डॉ. पट्टणशेट्टी, जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी बैठकीनंतर जिल्हा रुग्णालय आणि त्यानंतर महानगरपालिका आणि रोटरी क्लब संचलित कोविड केअर सेंटरला भेट दिली. तेथील सोयीसुविधांची पाहणी यावेळी श्री. गमे यांनी केली. त्यांनी सेंटरमध्ये रुग्णांची काळजी घेण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती महानगरपालिकेचे डॉ. सतीश राजूरकर यांच्याकडून घेतली. रोटरी क्लबचे अध्यक्ष अमित बोरकर, क्षितीज झावरे, प्रसन्न खासगीवाले,  गीता गिल्डा,  ईश्वर बोरा आदी यावेळी उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !