‘ माझे कुटुंब - माझी जबाबदारी ’ मोहिमेत सर्वांचा सहभाग आवश्यक - पालकमंत्री हसन मुश्रीफ

संगमनेर Live
0
◻ सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी आरोग्यविषयक नियम गांभीर्याने पाळण्याची गरज.

संगमनेर Live | कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम सुरु केली आहे. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, शासन यंत्रणा आणि नागरिक यांनी आता पुढाकार घेऊन कोरोनाला हरवण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. या मोहिमेच्या अंमलबजावणीमुळे रुग्णांची संख्या वाढणार असली तरी त्यामुळे लवकर निदान होऊन रुग्णांना वेळेवर उपचार मिळू शकतील, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. केंद्र शासन आता लॉकडाऊनच्या बाजूने नाही. त्यामुळे राज्य शासन अथवा स्थानिक प्रशासन तसा निर्णय घेत नाही.

महानगरपालिका अथवा स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या पातळीवर सर्वांशी विचारविनिमय करुन ‘ जनता कर्फ्यू ’ सारखा निर्णय घेऊ शकतात, मात्र, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी अधिक गांभीर्याने आरोग्यविषयक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. असे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे कोरोनासंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह, महानगरपालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, अन्न व औषध प्रशासन विभागाचे उपायुक्त अशोक राठोड, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके आदी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर श्री. मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी, सध्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या, रुग्णालयांना आवश्यक ऑक्सीजन पुरवठा, जिल्ह्यातील औषधपुरवठा, रुग्णालयातील उपलब्ध बेडसची संख्या आदींची माहिती घेतली. जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जवळपास ८५ टक्के इतके आहे. राज्याच्या तुलनेत सरासरी हे प्रमाण जास्त आहे. सध्या जिल्ह्यात ४ हजार ३३३ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना रुग्णांचा मृत्यू होऊ नये, यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करीत असते. नागरिकांनीही आजार अंगावर न काढता वेळीच लक्षणे जाणवल्यास उपचार घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम २५ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. घरोघर जाऊन नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. तसेच चाचण्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली तरी त्यांच्यावरील उपचारासाठी पुरेशी व्यवस्था प्रशासन आणि आरोग्य विभागाने केली असल्याची माहिती श्री. मुश्रीफ यांनी यावेळी दिली.  नगरपालिका अथवा महानगरपालिका क्षेत्रात विविध डॉक्टरांनी एकत्र येऊन त्यांची सेवा रुग्णांसाठी किफायतशीर दरात उपलब्ध करुन दिल्यास प्रशासनही त्यांना त्यासाठी लागणार्‍या आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देईल, असे ते म्हणाले.

जिल्ह्यातील प्रश्नांच्या संदर्भात पालकमंत्री म्हणून आपली वेगळी भूमिका नाही, तर जी जनतेची भावना आहे, त्या भावनेसोबत आपण आहोत, असे त्यांनी के. के. रेंज जमीन संपादन प्रकरणी प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती घुले, आ. जगताप आणि महापौर वाकळे यांनीही जिल्ह्यातील परिस्थिती पालकमंत्र्यांसमोर मांडली.

जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी जिल्ह्यात ऑक्सीजनचा पुरेसा साठा असल्याचे तसेच अत्यावश्यक प्रसंगी ऑक्सीजनची गरज लागल्यास त्याच्या उपलब्धतेबाबतही नियोजन केले असल्याची माहिती यावेळी दिली.

              

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !