◻ कांदा उत्पादक शेतकरी संकटात ; घरगुती बियानं ही मिळेना.
संगमनेर Live | (राजू नरवडे) : संगमनेर तालुक्यातील घारगाव सह मुळा खोरे परिसरातील सर्व सामान्य शेतकऱ्यानी मोठ्या प्रमाणात गावठी कांद्याची रोपे टाकली होती. पण जास्त पाऊस झाल्याने कांद्याची रोपे सडून गेली आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून आता गावठी कांद्याचे घरगुती बी ही मिळत नसल्याने यावर्षी कांद्याचे क्षेत्र घटते की काय असा प्रश्न ही निर्माण झाला आहे.
घारगाव, साकूर सह मुळा खोरे परिसरातील व पठारभागातील सर्व सामान्य शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात गावठी कांद्याची लागवड करत असतात ही लागवड करण्यासाठी शेतकरी घरीच कांद्याचे बियाने तयार करतात व ते आपल्या शेतात टाकुन घरघुती पद्धतीने रोप तयार करत असतात. परंतु मागील वर्षी खराब वातावरणामुळे शेतकर्यांच्या घरी कमी प्रमाणातच बियाने तयार झाले. यामुळे मागील वर्षी हजार रूपये किलोने मिळनारे बियाणे आता चार हजार रुपये किलोने घेण्याची नामुष्की शेतकर्यांवर ओढवली होती. परंतु एवढे करूनही शेतकर्यांनी कांदा बियाणे खरेदी करून आपल्या शेतीत रोप बनवण्यासाठी टाकले होते. निसर्गाची अवकृपा झाल्यामुळे सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने शेतकर्यांच्या नाकी नऊ आणत संपुर्ण कांद्याची रोप सडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यानी पुन्हा मिळेल त्या भावाने कांद्याचे बी खरेदी करून रोप टाकली होती.
शनिवारी ढगफुटी सदृश्य पावसामुळे कांद्याची रोप पूर्णपने पाण्याखाली गेली होती. तर शेतांना नदीचे स्वरूप आले होते. जीकडे तिकडे पाणीच पाणी साचल्याने काढणीसाठी आलेले सेंद्रिय लाल कांद्याचेही मोठे नुकसान पावसामुळे झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. सध्या तरी कांद्याचे बाजारभाव वाढल्यामुळे अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यानी पुन्हा दहा ते बारा हजार रुपये पायलीने कांद्याचे बी खरेदी केले आहे. तर आता घरगुती कांद्याचे बियान मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यानी कृषी केंद्रामधून बी खरेदी केले आहे. पावसाने उघडीप दिल्यावरच रोप टाकण्याचा निर्णय शेतकऱ्यानी घेतला आहे. सध्या तरी शेतकऱ्यानी टाकलेल्या गावठी कांद्याची रोप सडून गेली असून पिवळीही पडली आहेत. त्यामुळे या पावसाने शेतकऱ्याच्या मोठ्या नुकसानी झाल्यामुळे ‘ ईकडे आड तिकडे विहीर ’ अशी अवस्था शेतकऱ्याची झाली आहे.