संगमनेर Live |(राजू नरवडे) : संगमनेर तालुक्याच्या पठार भागावरील कर्जुले पठार येथील विज उपकेंद्रा मध्ये विज वाहक तारेचा शाॅक बसून कंत्राटी यंत्र चालक (ऑपरेटरचा) जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवार दि. २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली असून सोपान भावका कुलाळ (वय - २९) रा. टाकेवाडी, जवळे बाळेश्वर असे मृत्यू झालेल्या ऑपरेटरचे नाव आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कर्जुले पठार याठिकाणी असलेल्या विज उपकेंद्रात कंत्राटी यंत्र चालक (ऑपरेटर) म्हणून सोपान कुलाळ हे काम करत होते. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कुलाळ हे उपकेंद्रा मध्ये काम करत असताना त्यांना विज वाहक तारेचा शाॅक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सोपान कुलाळ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर च्या कुटीर रूग्णालयात नेण्यात आला होता.
या प्रकरणी घारगाव विज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता आशिष रणदिवे यांनी दिलेल्या खबरी वरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड काॅन्सटेबल आदिनाथ गांधले हे करत आहे. दरम्यान सोपान कुलाळ यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.