◻ रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य ; खड्डे हुकवायच्या नादात अपघाताची संख्या वाढली.
संगमनेर Live (राजू नरवडे) | संगमनेर तालुक्यातून जाणार्या पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा, एकल घाट, डोळासणे व चंदनापुरी घाट या सर्व ठिकाणी मोठे खड्डे पडल्यामुळे हे खड्डे हुकवायच्या नादात वाहन चालकांकडून अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन रोज लाखात टोल वसूल करणार्या ठेकेदार कंपनीला तात्काळ हे खड्डे बुजविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांसह वाहन चालकांतून जोर धरु लागली आहे.
पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा बाह्यवळण, नवीन माऊली एकल घाट, डोळासणे उड्डाणपूल व चंदनापुरी घाट या सर्व ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रात्रीच्या वेळी छोट्या - मोठ्या वाहनचालकांना खड्डे दिसत नसल्याने भरधाव वेगात असणार्या वाहनावर नियंत्रण मिळविणे कठीण होते. यातून ती वाहने खड्ड्यांमध्ये जोरदार आदळत असतात. यामध्ये वाहनाचे नुकसान होण्याबरोबर चालक, वाहक अथवा प्रवाशांना गंभीर इजा होत आहे. मध्यंतरी पावसाळ्यात तर या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचायचे. तर महामार्गावर देखील कमरेएवढे पाणी यायचे. यातून वाहनचालक जीवावर उदार होऊन प्रवास करायचे. मात्र, सर्व्हिस रोडची अपूर्णता याप्रमाणे याकडेही कानाडोळा करुन कंपनीने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत.
तीन ते चार दिवसांपूर्वीच खड्डा हुकवायच्या नादात एक कार पलटी झाली. मात्र दैव बलवत्तर असल्याने कारचालक बालंबाल बचावला होता. महामार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी वारंवार करूनही याकडे संबंधित विभाग आणि ठेकेदार कंपनी दुर्लक्ष करत आहे. यापूर्वी देखील विविध कारणांनी ठेकेदार कंपनी चर्चेत राहिली आहे. एरव्ही छोट्या - मोठ्या मालवाहू आणि प्रवासी वाहनांकडून लाखो रुपयांचा टोल वसूल केला जातो. त्यानुसार महामार्गाची देखभाल करणे देखील तितकेच गरजेचे आहे. परंतु ‘ सुनता है कौन ’ प्रमाणे संबंधित विभाग आणि ठेकेदार कंपनी डोळ्यांसह कानांवर हात ठेवून असल्याचेच यावरुन अधोरेखित होत आहे. त्यामुळे टोल प्रशासनाच्या कारभारावर परिसरातील नागरिकांसह वाहन चालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.