संगमनेर Live (राजू नरवडे) | संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील दैवत रंगनाथ आहेर या शेतकऱ्याच्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून शेळी जागीच ठार केली आहे ही घटना बुधवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे दिवसा ढवळ्या बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, घारगाव शिवारातील खोबरे मळा याठिकाणी दैवत आहेर हे शेतकरी राहात आहे. बुधवारी दुपारी त्यांचा मुलगा दर्शन हा घरा पासूनच काही अंतरावर असलेल्या शेतात शेळ्या चारण्यासाठी घेवून गेला होता. त्याच दरम्यान त्याठिकाणी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शेळीवर हल्ला करत शेळीला गीन्नी गवतात ओढत नेले. हे सर्व दृष्य पाहून दर्शन याने जोर जोराने आरडा ओरड केल्याने बिबट्याने लगेच धुम ठोकली. तर आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनेची माहिती वनविभागाला कळवण्यात आली. त्यामुळे अधिकाऱ्यानी घटनास्थळी धाव घेत मृत शेळीचा पंचनामा केला आहे.
दिवसा ढवळ्या बिबट्याने शेळीवर हल्ला करून शेळी ठार केल्याने नागरिकांनमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी याठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यानी केली आहे.