◻ धानोरे येथे महसुल यंत्रणे विरोधात स्मशानभुमीत गांधी जयंती दिनी उपोषण.
संगमनेर Live (भगवान लांडे) | महसुल विभागातील कर्मचाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराची व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी यासाठी धानोरे येथील सामाजिक कार्यकर्ते सुर्यभान दिघे व आदिनाथ दिघे यांनी २ ऑक्टोबर रोजी म्हणजे महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी ‘ हे राम ’ म्हणत स्मशानभुमीतील शवदाहिनीवर सरपन रचुन त्यावर आमरण उपोषण सुरू केले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रवरा नदीपात्रात लाखो रुपयाच्या वाळू चोरीप्रकरणात गैरव्यवहार करणाऱ्या तत्कालीन कामगार तलाठी व त्यांना मदत करणाऱ्या महसुल अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तो पर्यत स्मशानभुमीतील आमचे आमरण उपोषन थांबणार नाही असा पवित्रा सुर्यभान दिघे व आदिनाथ दिघे यांनी घेतला आहे.
धानोरे गावातील प्रवरा नदीपात्रातील नदीतुन मागील काही वर्षापासुन महसूलचे अधिकारी व कामगार तलाठी यांनी संगनमताने वाळू तस्करांना मदत करत प्रचंड प्रमाणात वाळूचा उपसा केला. लाखो रूपयांची वाळू अवैध मार्गाने चोरीस गेली असताना कारवाई होत नसल्याने मागील वर्षी १५ जुलै २०१९ ला बापूसाहेब दिघे यांनी धानोरे येथील तलाठी कार्यालयासमोर उपोषण केले असता तत्कालीन तहसीलदार, मंडलाधिकारी व तलाठी यांनी या वाळू चोरी प्रकरणी पंचनामे करून संबधीतांकडून वसुली करण्याचे आश्वासन दिले होते. परंतू वर्षाचा कालावधी उलटुनही महसुलच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कोणतीही चौकशी न करता कागदी घोड़े नाचवण्याचा निंदनीय प्रकार करून वाळू चोरी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे आंदोलन करण्याची वेळ आल्याचे उपोषण कर्त्यांनी म्हटले आहे.
जो पर्यत दोषींवर कारवाई होत नाही, तो पर्यत ‘ हे राम ’ आंदोलन सुरु राहाणार असुन या आंदोलनास मुळा प्रवरा खोरे पर्यावरण संवर्धन समीतीने पाठींबा दिल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान सायंकाळी राहुरीचे नायब तहसीलदार तळेकर यानी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली परंतू उपोषणकर्ते आपल्या मागण्यावर ठाम असल्याने उपोषण सुरु होते. तर उपोषणस्थळी दोन पोलीस कर्मचारी हजर आहेत.