◻ महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी घेतली कोरोना आढावा बैठक.
संगमनेर Live | संगमनेर शहर व तालुक्यातील कोरोना साखळी संपुष्टात आणण्यासाठी प्रशासन पूर्ण ताकदीनिशी काम करत आहे. मात्र यामध्ये नागरिकांचाही चांगला सहभाग मिळाला आहे. ग्रामीण भागात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक असली तरी, रेपीड टेस्टींमुळे हे रुग्ण लवकर कळत असून बरे होणाचे प्रमाणही चांगले आहे. तरीही भावनेपेक्षा वस्तुस्थितीला प्रत्येकाने महत्त्व देत माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान अधिक सतर्कनेते राबवा अशा सूचना राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केल्या आहेत.
एसएमबीटी दंत महाविद्यालयात बोलवण्यात आलेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगळूरे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गट विकास अधिकारी डॉ. सुरेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, पोलीस निरीक्षक अभय परमार, सुनील पाटील आदी उपस्थित होते.
या बैठकीत तालुका व शहरातील कोरोनाची साखळी पुर्ण तोडण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना सहकारी संस्थांच्या वतीने सुरू करण्यात आलेले कोविड केअर सेंटर, तालुक्यातील रुग्ण तपासणी व्यवस्था याबाबतची माहिती महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी घेऊन प्रशासकीय अधिकार्यांना काही सूचना केल्या.
याप्रसंगी नामदार थोरात म्हणाले की, राज्यात व तालुक्यात कोरोनाची साखळी संपुष्टात आणण्यासाठी प्रशासन चांगले काम करत असल्याने त्याला नागरिकांची ही साथ मिळत आहे. मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून तालुका पातळी, जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गट व गाव निहाय विविध आरोग्याच्या कमिट्या करून नागरिकांमध्ये जनजागृती सुरु आहे. संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून १७१ गावांचा समावेश आहे. मात्र चांगल्या वैद्यकीय सुविधा व नागरिकांनी घेतलेली काळजी यामुळे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. सहकारी संस्थांनी कोविड केअर सेंटर साठीची प्रशासनाला चांगली मदत केली आहे. ग्रामीण भागामध्ये होणारे घरगुती समारंभ नागरिकांनी जाणीवपूर्वक टाळणेसाठी पदाधिकार्यांनी मार्गदर्शन करावे . हा संकटाचा काळ आहे या काळात भावनेपेक्षा वस्तुस्थितीला प्रत्येकाने महत्त्व द्यावे. नागरिकांनी काही लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी. कोरोना ची संपूर्णपणे साखळी तोडणे हे आपले सर्वांचे अंतिम उद्दिष्दष्ट असून लवकरात लवकर तालुका कोरोना मुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी कोरोना परिस्थितीची माहिती सांगितली.