नागरिकानमध्ये दहशत ; दिवसभर लांडग्याचा परिसरात धुमाकूळ.
संगमनेर Live (राजू नरवडे) | जंगली श्वापदांचा संचार मानवी वस्तीकडे वाढल्याने हल्ल्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे चित्र संगमनेर तालुक्यात दिसत आहे. बिबट्याने हल्ला केल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. परंतु, पठारभागातील रणखांब गावांतर्गत असलेल्या लांडगदरा येथे लांडग्याने धुमाकूळ घालत आज्जीचे बोट तोडत नातीलाही गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी (ता. २) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. तसेच लांडग्याने चार जनावरांवरही हल्ला केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, रणखांबच्या लांडगदरा येथील गोरख रंगनाथ गुळवे हे शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहत असून शुक्रवारी दुपारी त्यांची पत्नी चंद्रकला व नात ऋतुजा या दोघी घरासमोरील अंगणात काम करत होत्या. त्याचवेळी अचानक लांडग्याने हल्ला चढवत आज्जी चंद्रकला यांच्या डाव्या हाताचे बोट तोडले व हाताच्या पंज्यालाही जोराचा चावा घेतला. त्यानंतर लांडग्याने जवळच असलेल्या ऋतुजाकडे वळत जोरदार हल्ला करुन तिच्या मानेवर, चेहर्यावर व हाताला गंभीर दुखापत केली. त्यामुळे दोघेही रक्तबंबाळ झाल्या होत्या.
यावेळी आज्जी चंद्रकला यांनी जोरजोराने आरडा-ओरड केल्याने आजूबाजूला असलेल्या काही नागरिकांनी त्यांच्या घराच्या दिशेने धाव घेत लांडग्याला पिटाळून लावले. त्यानंतर लांडग्याने परिसरातील शेतकरी अर्जुन मच्छिंद्र गुळवे यांच्या दोन गायी, वासरू आणि शेळीवर हल्ला करत त्यांनाही गंभीर दुखापती केल्या. शेळीचा कान तोडून करडू जागेवरच ठार केले. दिवसभर लांडग्याने रणखांब परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या आज्जी चंद्रकला व नात ऋतुजा या दोघींवर संगमनेरच्या खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत.
दरम्यान रणखांब परिसरात लांडग्यांचे दर्शन होण्याबरोबरच हल्ले होत असल्याने ग्रामस्थांनी वन विभागाकडे या जंगली श्वापदांचा मानवी वस्तीकडे होणारा संचार रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा बिबट्यांबरोबर लांडग्यांच्या दहशतीने घराबाहेर पडणे देखील मुश्कील होईल, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे.