केंद्राच्या शेतकरी कायद्याविरोधात उद्या काँग्रेसचा राज्यव्यापी सत्याग्रह - ना. थोरात

संगमनेर Live
0
वर्ध्याच्या सेवाग्राम येथील सत्याग्रहात एच. के. पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण सहभागी होणार.
 

संगमनेर Live | केंद्रातील भारतीय जनता पक्षाने लादलेले अन्यायी शेतकरी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने आंदोलन आणखी तीव्र केले आहे. या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून उद्या ३१ ऑक्टोबरला राज्यव्यापी सत्याग्रह करण्यात येणार आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा हुतात्मा दिन तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधत या दिवशी राज्यभरात ‘ किसान अधिकार दिवस ’ पाळला जाणार असून, या काळ्या कायद्यांविरोधात सत्याग्रह करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

या संदर्भात बोलताना ना. थोरात म्हणाले की, वर्ध्यातील सेवाग्राम येथे सत्याग्रहाचा मुख्य कार्यक्रम होणार असून त्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनिल केदार, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालयी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सत्याग्रहात भाग घेऊन या जुलमी कायद्याला विरोध दर्शवतील.  

मोदी सरकारने विरोधी पक्षांची मते विचारत न घेताच पाशवी बहुमताच्या जोरावर हे कायदे मंजूर करुन घेतले आहेत. हे कायदे मूठभर उद्योपतींचे हित डोळ्यासमोर ठेवून केले असून यामुळे शेतकरी मात्र देशोधडीला लागणार आहे. बळीराजाला या कायद्याच्या माध्यमातून उद्योगपतींचा गुलाम बनवण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी तसेच शेतकर्‍यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली असून हे काळे कायदे रद्द करेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरुच राहणार आहे.

केंद्र सरकारच्या काळ्या कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी १५ ऑक्टोबरला काँग्रेसने राज्यव्यापी भव्य महाव्हर्च्युअल रॅली आयोजित करून आवाज उठवला होता. आता २ कोटी सह्यांची मोहिमही सुरु असून राज्यभरातून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या सह्यांचे निवेदन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिले जाणार आहे. आंदोलनाच्या पुढील टप्प्यात टॅक्टर रॅली काढून विरोध आणखी तीव्र केला जाणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले आहेत.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !