तालुकास्तरीय यंत्रणांनी गतिमानतेने काम करण्याची गरज - जिल्हाधिकारी

संगमनेर Live
0
तालुकास्तरावरील ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्याकडून आढावा. 

संगमनेर Live | कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ ही मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन त्यातील सदस्यांची कोरोनादूत तपासणी करत आहेत. मात्र, ही मोहिम प्रत्येक तालुकास्तरीय यंत्रणांनी अधिक गतिमानतेने राबविण्याची गरज आहे. त्याचबरोबर, सर्वेक्षणाची माहिती लगेचच पोर्टलवर अपलोड करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे तालुकास्तरीय यंत्रणांशी संवाद साधून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी  डॉ. दादासाहेब साळुंके आदी यावेळी उपस्थित होते. तालुकास्तरावरुन आरोग्य यंत्रणांचील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले, जिल्ह्यात सतराशेहून अधिक पथकांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबांना भेट देऊन त्यांची माहिती घेतली जात आहे. आपले कोरोनादूत घरोघरी जाऊन हे काम करत आहेत. मात्र, तांत्रिक कारणांचा बाऊ करुन काही ठिकाणी कामाची गती कमी दिसत आहे. अहमदनगर जिल्हा राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना आणि मोहिम यांच्या अंमलबजावणीत नेहमीच अग्रेसर असतो. त्यामुळे हाच लौकिक कायम ठेवण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना त्यांनी केल्या.

अनेक ठिकाणी पथकांनी सर्वक्षण करुन माहिती गोळा केली आहे. मात्र, ही माहिती राज्य शासनाच्या पोर्टलवर वेळेवर अपलोड करणे अपेक्षित आहे. त्यामुळेच जिल्ह्याचे काम दिसणार आहे. गेले सहा महिने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा काम करत आहे. कामाचा हाच वेग या मोहिमेत कायम ठेवायचा आहे. जिल्ह्यात कोरोनाची लक्षणे जाणवणार्‍या रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी चाचण्यांची संख्या अजून वाढविण्याची गरज आहे. सर्वेक्षणा दरम्यान लक्षणे जाणवणार्‍या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांची चाचणी करण्याची आवश्यकता आहे.

जिल्ह्यात अधिकाधिक चाचण्या व्हाव्यात, यासाठी आपण जिल्हा रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबची क्षमता वाढविली आहे. त्यामुळे अॅन्टीजेन चाचण्यांबरोबरच रुग्णांचे घशातील स्त्राव नमुने आरटीपीसीआर लॅबमध्ये पाठविण्यात याव्या. जास्तीत जास्त प्रमाणात चाचण्या करुनच आपण जिल्ह्यातील संभाव्य रुग्णांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यापासून इतरांना होणारा संसर्ग रोखण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे याबाबत तालुकास्तरीय यंत्रणांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !