◻ शेजवळ कुटुंबियांच्या अनोख्या पशुप्रेमाची तालुक्यात चर्चा.
संगमनेर Live (राजू नरवडे) | संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील रणखांब येथील पशुपालक सूर्यभान कोंडाजी शेजवळ यांनी आपल्या ‘ शक्ती व शिवा ’ या बैलजोडीचा वाढदिवस सोमवार (दि. ५ ऑक्टोबर) रोजी मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. या अनोख्या वाढदिवासाची परिसरासह तालुक्यात चांगलीच चर्चा सुरु झाल्याने पशुपालक शेजवळ यांच्या पशुप्रेमाचे शेतकर्यांकडून कौतुक होत आहे.
पठारभागातील रणखांब येथील शेतकरी सूर्यभान शेजवळ आधुनिक युगातही यांत्रिक शेतीला छेद देऊन पारंपारिक शेती करत आहे. यासाठी त्यांनी ‘ शक्ती व शिवा ’ या बैलजोडीचा आपल्या मुलांसारखा सांभाळ केला आहे. त्यानुसार शक्ती व शिवा देखील आपल्या बळीराजाला साथ देत इमाने इतबारे शेतीत राबत आहेत. कुटुंबाच्या प्रगतीत या बैलजोडीचा मोलाचा वाटा राहिल्याने पशुपालक शेजवळ देखील त्यांना काहीच कमी पडू देत नाहीत. सोमवारी या बैलजोडीचा जन्मदिवस असल्याने शेजवळ कुटुंबियांनी आपले कौटुंबिक सदस्य असलेले ‘ शक्ती व शिवा ’ या बैलजोडीचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी जय्यत तयारीही केली.
घरासह आवारात आकर्षक विद्युत रोषणाई केली. तसेच ‘ शक्ती व शिवा ’ बैलजोडीला देखणा साजश्रृंगार केला. यावेळी पुरणपोळीचा स्वयंपाक करुन जेवणावळीही केली. या सोहळ्यामध्ये परिसरातील शेतकरी आणि पाहुणेही सहभागी झाले होते. सोहळ्यावेळी संगीतमय वातावरणात केक कापून ‘ शक्ती व शिवा ’ चा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. या अनोख्या सोहळ्यास उपस्थितांनी भरभरुन दाद देत परिसरासह तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.