संगमनेर Live | राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी भाऊसाहेब जेजूरकर आणि उपसभापती पदावर बाळासाहेब जपे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
मावळते सभापती बापूसाहेब आहेर आणि उपसभापती वाल्मिकीराव गोर्डे यांच्या पदाचा कार्यकाळ संपल्याने नविन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी संचालक मंडळाची विशेष सभा प्रांताधिकारी गोविंद शिंदे आणि सहायक निंबधक शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.
सभापती भाऊसाहेब जेजूरकर यांच्या नावाची सूचना वाल्मिकराव गोर्डे यांनी मांडली, या सूचनेस कृष्णकांत गोरे यांनी अनुमोदन दिले. उपसाभपती पदासाठी बाळासाहेब जपे यांच्या नावाची सूचना सभापती बापूसाहेब आहेर यांनी मांडली त्यास शरद मते यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदांसाठी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी सभापती भाऊसाहेब जेजूरकर आणि उपसभापती पदावर बाळासाहेब जपे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
निवडणूक प्रक्रियेनंतर माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांचा संत्कार करण्यात आला. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना महसूल विभागाच्या मिळालेल्या पुरस्काराबद्दल बाजार समितीच्या वतीने आ. विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आ. विखे पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना रहाता बाजार समितीने राज्यात मिळविलेल्या नावलौकीकाची परंपरा कायम ठेवण्यासाठी संघटीतपणे काम करण्याचे आवाहन केले. माळवते सभापती बापूसाहेब आहेर यांनी मागील कार्यकाळात सर्वानी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. नूतन सभापती भाऊसाहेब जेजूरकर आणि उपसभापती बाळासाहेब जपे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी गणेश कारखान्याचे चेअरमन मुंकूदराव सदाफळ यांच्यासह बाजार समितीचे सर्व संचालक अधिकारी उपस्थित होते.