देव पावले.. सोमवारपासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडणार.

संगमनेर Live
0
हा फक्त सरकारी आदेश नसून ‘ श्री ’ ची इच्छा - मुख्यमंत्री

संगमनेर Live | दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच सोमवारपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्री’ ची इच्छा समजा असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानी यावेळी म्हटले आहे. 

*******

अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी राज्यातील मंदिरं मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. अनलॉकमध्ये बहुतेक सर्वच बाबी सुरु झाल्याने राज्यातील मंदिरंही खुली करावीत अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. याची दखल घेत अखेर ठाकरे सरकारने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळं उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, “ दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर करोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. 

राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मियांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच.”

करोनाच्या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने ‘ देव ’ पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

हा फक्त सरकारी आदेश नसून ‘ श्री ’ ची इच्छा असे समजा. मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील, असे भावनिक आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !