◻ पिप्रीं - लौकी येथिल तरुणाच्या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक.
◻ लग्नाच्या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन.
संगमनेर Live | विवाह सोहळ्याच्या पत्रिकेत पारंपरिक पद्धतीने छापण्यात येणारी नावे टाळून सद्ययस्थतीत आवश्यक असलेला सामाजिक संदेश छापत संगमनेर तालुक्यातील पिप्रीं - लौकी आजमपूर येथील शेतकऱ्याच्या मुलाने लग्नपत्रिकेच्या माध्यमातून अनोखी जनजागृती केली असून ही लग्नपत्रिका सोशलमीडियात वेगाने वायरल झाल्याने विशालच्या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संगमनेर तालुक्यातील पिप्रीं - लौकी आजमपूर येथील सोमनाथ नामदेव गिते व सुनिता गिते यांचा मुलगा विशाल हा नोकरीनिमित्त अमेरिकेत असतो. त्याचा विवाह शिबलापूर (ता. संगमनेर) येथील सुभाष मुरलीधर बोद्रें व ललीता बोद्रें यांची मुलगी कांचन हिच्या समवेत २२ नोव्हेंबर रोजी सकाळी आश्वी शिबलापूर रस्त्यावरील मंगलकार्यालयात आयोजित केला आहे.
******
या विवाह सोहळ्याच्या पत्रिकेत पारंपरिक पद्धतीने छापण्यात येणारी आशिर्वाद, पुण्यस्मरण, प्रमुख उपस्थिती, आपले नम्र, कार्यवाहक, व्यवस्थापक, मामा, काका, किलबिल आदि नावे यांना फाटा देऊन केवळ वधू, वर व त्यांच्या आई वडीलांची नावे छापण्यात आली आहेत. यातून समाजात घटत चाललेले मुलींचे प्रमाण यासाठी बेटी बचाव बेटी पढाव, वृक्ष तोडमुळे वाढलेली ग्लोबल वार्मिंग यासाठी जेव्हा हिरवीगार पृथ्वी असेल तेव्हा शांत स्वस्थ जनता असेल, दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर पाणी देते प्रत्येक जीवाला जीवन दान करुया, पाणी जतन सर्वश्रेष्ठ काम, रक्तदान करा जीव वाचवा, नेत्रदान श्रेष्ठ दान, स्वच्छ भारत सुंदर भारत असे समाज प्रबोधन करणारे सामाजिक संदेश छापून समाजात जन जागृती करण्याचे काम विशाल गिते व त्यांच्या कुटुंबीयांनी केल्याने त्यांच्या या विवाह सोहळ्याच्या पत्रिकेची सध्या सोशलमिडीत जोरदार चर्चा सुरु आहे.
*******
दरम्यान लग्नाच्या दिवशी विशालने विवाह स्थळी रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त जनानी रक्तदान करावे असे आवाहन गिते व बोद्रें परिवाराने केले आहे.
******