◻ दुसऱ्या महायुद्धामध्ये संगमनेर च्या भुमिपुत्राने गाजवले होते अतुलनीय शौर्य.
संगमनेर Live | दुसऱ्या महायुद्धामध्ये इटलीमधील सिनोई नदीच्या काठावर जर्मन सैन्याची दाणादाण उडवुन आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचवून अतुलनीय शौर्य गाजवणारे संगमनेरचे भूषण व निमज येथे जन्मभूमी असलेल्या व्हिक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधव यांचे संगमनेर शहरात स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती संगमनेर शहराच्या नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना सौ. तांबे म्हणाल्या कि, संगमनेर तालुक्याला व शहराला मोठ्या थोर भूमिपुत्रांची परंपरा लाभली असून स्वर्गीय नामदेवराव जाधव हे संगमनेर व अकोले तालुक्याचे भुषण आहे. निमज येथे जन्मलेल्या नामदेवराव जाधव यांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये इटली मधील सिनोई नदीच्या काठावर जर्मन सैन्याची दाणादाण उडवून आपल्या १०० सहकाऱ्यांचे प्राण वाचून अतुलनीय असे शौर्य गाजवले होते.
त्यांचे शौर्य आणि पराक्रम पाहून ब्रिटिशांनी त्यांना इंग्लंडचा सर्वोच्च सन्मान विक्टोरिया क्रॉस हा प्रदान केला होता. इंग्लंड मधील म्युझियममध्ये ही त्यांचा पुतळा ठेवण्यात आला असून इटलीमधील सिनोई नदीच्या काठावर जेथे हा रणसंग्राम झाला तेथे सुद्धा त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. मराठा रेजिमेंट ट्रेनिंग सेंटर बेळगाव येथे सुद्धा त्यांचे स्मारक उभारण्यात आले असून आपल्या अकोले तालुक्यातील विरगाव येथे ही त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे.
संगमनेर, अकोले तालुक्याच्या भूमिपुत्रांची यशोगाथा ही या जिल्ह्यासाठी प्रेरणादायी असून येणाऱ्या पिढीला त्यांच्या पराक्रम व अभूतपूर्व शौर्याची माहिती व्हावी यासाठी संगमनेर नगरपालिकेच्या वतीने स्मारक उभारण्यात येणार आहे. संगमनेर शहर हे अहमदनगर जिल्ह्यातील सांस्कृतिक व वैभवशाली शहर असून अशा या समृद्ध परंपरा असलेल्या शहरात सातत्याने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली गौरव केला जात आहे.
१६० वर्षांची की परंपरा असलेल्या संगमनेर नगरपरिषदेने कायम राष्ट्रपुरुष, देशभक्त, क्रांतिकारक या सर्वांनी प्रती आदर व्यक्त केला असून आगामी काळात व्हिक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधव यांचे स्मारक उभारून भावी पिढीला त्यांच्या विचारांची व कार्यकर्तृत्वाची प्रेरणा मिळावी यासाठी काम केले जाणार असल्याचे ही त्या म्हणाल्या आहेत.