◻ जाफरबाद येथिल पाझर तलावाला लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव.
संगमनेर Live | पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळविण्यासाठी युती सरकारने मंजूर केलेल्या ५० हजार कोटी रूपयांच्या आराखड्याला महाविकास आघाडी सरकारने कृतीत उतरविल्यास दुष्काळी भागाच्या संघर्षाला न्याय मिळेल अशी अपेक्षा भाजपचे जेष्ठनेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
श्रीरामपूर तालुक्यातील जाफरबाद येथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील यांच्या सहकार्याने बांधण्यात आलेल्या पाझर तलावाला लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव देण्यात आले. यानिमित्ताने आयोजित केलेल्या जलपूजन आणि विविध विकास कामाचे उद्घाटन आ.विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
माजी आमदार भानूदास मुरकूटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास नानासाहेब शिंदे, दिपक पठारे, नितीन भागडे, सोन्याबापू शिंदे, गिरीधर आसने, भाजपाचे जेष्ठ नेते गोरक्षनाथ ताके, गणेश मुदगले, सरपंच संदीप शेलार, दतात्रय संगपाल, चित्रसेन रननवरे आदी उपस्थित होते.
माजी आमदार भानूदास मुरकूटे यांनी आपल्या भाषणात उपस्थित केलेल्या पाणी प्रश्नाचा धागा पकडून आ. विखे म्हणाले की, गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात पश्चिम वाहीनी नद्यांचे पाणी आणण्यासाठी खासदार बाळासाहेब विखे पाटलांनी शासनाला सादर केलेल्या आराखड्या नंतर प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी सुरु झाली. दुष्काळी पट्ट्याला न्याय द्यायचा असेल तर, गतीने पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे पाण्याचा करावा लागलेला संघर्ष सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. यामुळे पाणी प्रश्नावर मोठे काम झाले. या संघर्षाला न्याय मिळण्याची वेळ आली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राज्य सरकारनेही दुष्काळी भागाकरीता काही पाऊले पुढे टाकली पाहीजे. मागील युती सरकारने या गोदावरीच्या खोऱ्यातील पाणी प्रश्नासाठी ५० हजार कोटी रुपयांचा आराखडा मंजुर केला होता. त्याची अंमलबजावणी महाविकास आघाडी सरकारने करावी अशी मागणी त्यांनी केली. ग्रामीण विकासाबरोबरच आता शेतकऱ्यांनी सुध्दा स्वयंपुर्ण होण्यासाठी आता सामुहीक प्रयत्न करण्याची गरज आहे.
करोना संकटानंतर अनेक युवकांनी रोजगारांच्या संधी शोधल्या आहेत. शेती उत्पादनाच्या भावासाठी आंदोलने करणाऱ्यांनी आजपर्यंत कोणतेच पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवले नाहीत. आता फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या, शेतकरी गट, महिला बचत गटांना कृषि क्षेत्रात मोठ्या संधी असल्याचे स्पष्ट करुन आ. विखे पाटील यांनी प्रश्न सोडविण्यासाठी आपली माणसे ओळखा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे यांनी आपल्या भाषणात समन्यायी पाणी वाटप कायद्याचा उल्लेख यासाठी कराव्या लागलेल्या संघर्षाचा उल्लेख करुन, शाश्वत पाणी उपलब्ध झाल्यास मोठ्या संख्येने तयार करण्यात आलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी दिपक पठारे, सरपंच संदिप शेलार यांची भाषणे झाली.