◻ आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतले लोणीचे ग्रामदैवत म्हसोबा महाराज यांचे ग्रामस्थांसमवेत दर्शन.
संगमनेर Live | भाविकांना मंदीरात प्रवेशासाठी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन भाजपाचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणीचे ग्रामदैवत म्हसोबा महाराज आणि हनुमान मंदीरात जावून ग्रामस्थांसमवेत दर्शन घेतले. राज्यातील मंदीर उघडण्याबाबत भाविकांच्या मागणीचा राज्य सरकारने उशिरा का होईना आदर केल्याची प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.
*******
कोव्हीड संकटाचे गांभीर्य लक्षात घेवून सर्वच प्रार्थना स्थळे भाविकांसाठी बंद करण्यात आली होती. मात्र लाॅकडाऊनचा टप्पा कमी करीत राज्य सरकारने सर्व आस्थापना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मंदीर सुरू होत नसल्याने तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेले व्यावसायिक अर्थिक संकटात सापडले होते. या व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेवून आ. विखे पाटील यांनी शिर्डी येथे घंटानाद आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले होते. मंदीराची दार उघडण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत यासाठी आ. विखे यांनी राज्यपालांची भेट घेतली होती.
राज्य सरकारने मंदीर सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर आ. विखे पाटील यांनी कोव्हीडच्या सर्व नियमांचे पालन करून लोणी येथील ग्रामदैवत म्हसोबा महाराज आणि हनुमान मंदीरात ग्रामस्थांसमवेत दर्शन घेतले. याप्रसंगी सरपंच अनिल विखे, उपसरपच लक्ष्मण बनसोडे, माजी उपसभापती सुभाष विखे, सिनेट सदस्य अनिल विखे, शंखर विखे आदी उपस्थित होते.
मंदीर सुरू करावीत आशी मागणी भाविकांची होती. सर्व नियमांचे पालन करुन यापुर्वीच राज्यातील मोठी देवस्थान सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असता तर तेथील व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला असता. परंतू सरकारने मंदीर सुरू करण्याचा निर्णय प्रतिष्ठेचा केला. पण उशिरा का होईना सरकारने भाविकांच्या मागणीचा आदर केला असल्याची प्रतिक्रिया आ. विखे पाटील यांनी व्यक्त केली.
कोव्हीडचे संकट अद्यापही कायम असल्याने मंदीर व्यवस्थापनाने दर्शनाबाबत केलेल्या नियमावलीचे पालन सर्वानी करावे असे आवाहन आ. विखे पाटील यांनी केले आहे.