हरितक्रांती नष्ट करणारे कायदे राज्यात लागू होऊ देणार नाही - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0

कृषी कायद्याविरोधात महाराष्ट्रातून ६० लाख सह्यांचे निवेदन दिल्लीकडे रवाना.

संगमनेर Live | केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना काँग्रेसचा तीव्र विरोध राहिला असून हे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. याच आंदोलनाचा भाग असलेल्या सह्यांच्या मोहिमेला महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल ६० लाख शेतकरी, शेतमजुरांच्या सह्या जमा करण्यात आल्या. महसुलमंत्री तथा प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आज महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे हे भव्य निवेदन सूपूर्द करण्यात आले. 

एवढ्या मोठ्या प्रमाणात सह्यांची मोहिम आतापर्यंत कोणत्याही पक्षाने राबवली नाही. या ६० लाख सह्याच या कायद्याला असलेला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध दर्शवतात. कृषी कायद्याविरोधातील महाराष्ट्रातील हा लढा देशाला दिशादर्शक ठरला आहे असे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील म्हणाले.
 

टिळक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, माजी मंत्री नसीम खान, मा. खा. हुसेन दलवाई, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनल पटेल, डॉ. वामसी रेड्डी, बी. एम. संदीप, संपतकुमार, आशिष दुआ, आ. भाई जगताप, आ. अमिन पटेल, आ. झिशान सिद्दीकी, सरचिटणीस मा. आ. मोहन जोशी, सचिन सावंत, राजेश शर्मा, सचिव राजाराम देशमुख, जोजो थॉमस, मेहुल व्होरा, झिशान सय्यद यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
 

यावेळी बोलताना पाटील पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने कृषी कायद्याविरोधातील आंदोलने मोठ्या हिरीरीने आणि यशस्वीपणे पार पाडली. ५० लाख शेतकऱ्यांचा सहभाग असलेली महा व्हर्च्युअल शेतकरी रॅली, ट्रॅक्टर रॅली, धरणे आंदोलन करुन या कायद्याविरोधात आवाज बुलंद केला. आता ६० लाख सह्यांचे निवेदन जमा केले हे काही छोटे काम नाही. इतिहासात अशी मोहिम राबवली गेली नाही. शेतकऱ्यांसाठी अन्यायी असलेले हे कायदे रद्द झाले पाहिजेत. महाराष्ट्र नेहमीच देशासाठी दिशादर्शक राज्य ठरले आहे. आताही महाराष्ट्र सरकारने पंजाबपेक्षा चांगला कृषी कायदा करुन शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करावे. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात काँग्रेसने सर्व आंदोलने यशस्वी केली आहेत. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे असे पाटील म्हणाले.  

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात हरितक्रांती झाली आणि कृषी क्षेत्राचे रुप बदलले परंतु सध्याच्या भाजपा सरकारने शेतकऱ्याला देशधडीला लावण्याचे काम केले आहे. या काळ्या कायद्याला विरोध करण्यासाठी काँग्रेसने मोठे आंदोलन हाती घेतले, महाराष्ट्रात ही आंदोलने मोठ्या प्रमाणात यशस्वी केली. कोरोना, अतिवृष्टी, पूरस्थिती असतानाही मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतकरी व कामगार या आंदोलनात सहभागी झाले. राज्यातील ६० लाख शेतकऱ्यांच्या सह्याचे निवदेन आम्ही आज प्रभारी एच. के पाटील यांच्यामार्फत सोनिया गांधी यांच्याकडे पाठवले आहे. देशभरातील शेतकऱ्यांचे सह्यांचे हे निवेदन १९ नोव्हेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे देण्यात येणार आहे. हे कायदे रद्द करण्यापर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरुच राहणार आहे, असेही थोरात म्हणाले.

यावेळी बोलताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारने संविधान, संसदीय नियम व परंपरा यांची पायमल्ली करुन कोणत्याही चर्चेविना कृषि व कामगार विषयक विधेयक मंजूर करुन घेतले व लागू केले. या विधेयकाला काँग्रेसचा सुरुवातीपासूनच विरोध होता. म्हणूनच भाजप सरकारच्या कृषी व कामगार विधेयकाला विरोध करण्यासाठी, शेतकरी व मजूर यांना पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार मुंबई काँग्रेसने मुंबईच्या प्रत्येक ब्लॉकमध्ये तसेच प्रत्येक विभागामध्ये कृषी व कामगार कायद्यांविरोधात सह्यांची मोहीम सुरु केली आणि मुंबईकरांनी देखील उस्फुर्तपणे या सह्यांच्या अभियानात सहभागी होऊन या कायद्याला आपला विरोध दर्शविला.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !