◻अन्नाच्या शोधात भरकटल्याचा अंदाज ; वन्यजीव प्रेमीमध्ये हळहळ.
◻ संगमनेर तालुक्यातील पहिलीचं घटना.
संगमनेर Live | समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांची संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर शिवारात शेतजमीन असून रविवारी १ वाजेच्या सुमारास संगमनेर पंचायत समितीचे माजी विरोधीपक्ष नेते सरुनाथ उंबरकर याना येथिल विहिरीत मृत हरीण आढळून आल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सरुनाथ उंबरकर यानी दिलेली माहिती अशी की, रविवारी दुुपारी १ वाजेच्या सुमारास मी कामानिमित्त माझ्या शेताकडे गेलो होतो. यावेळी बाळापूर शिवारातील इंदूरीकर महाराज यांच्या गट नं ४३ मधील विहीरीत सहज डोकावले असता त्यामध्ये मला मेलेले हरीण विहीरीतील पाण्यावर तरंगताना दिसले. यामुळे बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात हरीण आले कसे हे पाहूण मला आश्चर्य वाटले व दुसऱ्या क्षणी हरीण मृत झालेले असल्यामुळे मनाला वेदना झाल्याची माहिती उंबरकर यानी दिली.
उंबरकर यानी तात्काळ याबाबत संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शंशिकात मंगळुरे व वनक्षेत्रपाल सागर माळी यांना फोन करून सविस्तर माहिती कळवली. माहिती मिळताचं वनविभागाचे वनक्षेत्रपाल सागर माळी, वनपाल प्रशांत फड, वनरक्षक संतोष पारधी व त्याचे सहकरी बाळासाहेब डेगंळे, बाबासाहेब दिघे, बाळासाहेब आहेर, एकनाथ थेटे आदिसह उंबरी बाळापूर चे कोतवाल बर्डे हे घटनास्थळी हजर झाले व स्थानिक ग्रामस्थाच्या मदतीने त्या मृत हरणाला वरती काढून निबांळे रोपवाटिकेत नेत शवविच्छेदन करुन अत्यसंस्कार केले आहे.
दरम्यान इंदूरीकर महाराजाच्या विहिरीत हरीण पडून मृत झाल्याची माहिती व फोटो सोशल मिडियावर वायरल झाली होती. तर कोपरगाव परिसरात हरणाची संख्या असून रात्रीच्या अंधारात अन्नाच्या शोधात भरकटल्यामुळे या परिसरात आले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत असून संगमनेर तालुक्यातील ही पहिलीच दुर्दैवी घटना असल्याने वन्यजीव प्रेमीमधून हळहळ व्यक्त होत आहे.
संगमनेर तालुक्यातील प्रवरानदी तिरावरील गावामध्ये मागील अनेक वर्षापासून बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. यामुळे बिबट्यानी परिसरातील कोल्हे, मोर, ससे या वन्यप्राण्याची शिकार करुन नामशेष केले आहेत. तर आता दिवसाढवळ्या शेतकऱ्याच्या पशुधनाबरोबरचं इतर पाळीव प्राण्यावरही सरास हल्ले सुरु आहेत. अशा परिस्थित भरकटलेल्या हरणाचा एखाद्या बिबट्याने शिकारीसाठी पाठलाग केल्यामुळे जीव वाचण्यासाठी पळालेले हरीण थेट विहिरीत पडले असावे असा अंदाज अनेक वनजीव प्रेमीनी वर्तवला आहे.