कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनुयायांनी घरातूनच अभिवादन करावे - जिल्हाधिकारी.

संगमनेर Live
0
कोरेगाव भीमा येथिल जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे १ जानेवारीला सह्याद्री वाहिनीवर थेट प्रसारण.

संगमनेर Live | १ जानेवारी, १८१८ रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या युध्दामध्ये कामी आलेल्या व जखमी झालेल्या योध्यांच्या स्मरणार्थ सन १८२२ साली पेरणे ता. हवेली, जि. पुणे येथील भिमा नदीच्या तीराजवळ जयस्तंभ उभारण्यात आलेला आहे. जयस्तंभ अभिवादनास देशभरातून दरवर्षी दि. १ जानेवारी रोजी मोठया संख्येने अनुयायी येत असतात. मात्र, यावर्षी कोरोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी वरून थेट प्रसारण होणार आहे. त्यामुळे सर्व अनुयायांनी जयस्तंभ पेरणे येथे न जाता घरातूनच जयस्तंभास अभिवादन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले आहे.

यावर्षी झालेले विविध धार्मिक कार्यक्रम जसे की, १४ एप्रिल रोजीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, आषाढी व कार्तिकी वारी, गणेश उत्सव, नवरात्र, ईद, ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन हे साजरे करण्यासंदर्भात शासनाने वेळोवेळी सूचना निर्गमित केलेल्या आहेत. नागरिकांनी कोरोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर त्याचे पालन केले आहे.  त्याच धर्तीवर दिनांक १ जानेवारी २०२१ रोजी जयस्तंभ पेरणेफाटा येथील अभिवादन कार्यक्रमाचे अनुषंगाने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

अद्यापही जिल्ह्यात व राज्यात इतरत्र कोरोनाचे रूग्ण मोठया प्रमाणावर आढळून येत आहेत. चालू वर्षी कोविड या संसर्गजन्य रोगाचा झालेला प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या सात आठ महिन्यात आलेले सर्व धर्मीय सण, उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व लोकांनी एकत्रीत न येता साजरे केले आहेत. त्यामुळे दिनांक १ जानेवारी, २०२१ रोजी जयस्तंभ पेरणे येथे होणारा अभिवादन कार्यक्रम कोविडच्या पार्श्वभूमीवर पुर्ण खबरदारी घेवून अत्यंत साध्या पध्दतीने प्रतिकात्मक स्वरूपात पार पाडण्यात येणार आहे. कोविडचा धोका लक्षात घेऊन होणाऱ्या गर्दीवर निर्बध घालण्याच्या दृष्टीने पेरणे परिसरात स्थानिक प्रशासनामार्फत निर्णय घेण्यात आला आहे. कोविड विषाणुच्या पार्श्वभूमीवर जयस्तंभ पेरणे येथे येण्यावर तसेच पुणे जिल्हयातील अन्य ठिकाणी गर्दी करण्यास निर्बध असल्याने जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे दुरदर्शनवरून तसेच इतर माध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, त्यामुळे सर्व अनुयायांनी जयस्तंभ पेरणे येथे न येता घरातूनच जयस्तंभास अभिवादन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले आहे.

जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या ठिकाणी व आसपासच्या परिसरात कोणत्या प्रकारची सभा घेणे, खाद्यपदार्थ व पुस्तकांचे स्टॉल लावणे इत्यादींवर निर्बंध आहेत तसेच  कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन विभाग, आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबधीत महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी मार्गदर्शक सूचना आणि नियम विहित केले असून त्या नियमांचे पालन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !