संगमनेर Live | शिर्डी बाह्यवळण रस्त्याच्या संदर्भात निर्माण झालेल्या समस्यांबाबत आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना बरोबर घेवून थेट ग्रामस्थांशी संवाद साधला. रखडलेल्या कामास गती मिळावी म्हणून मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधून तातडीने निधीची उपलब्धता करुन देण्याची मागणी करतानाच, रस्त्याचे काम होईपर्यत वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याच्या सूचना पोलीस प्रशासनास देवून ग्रामस्थांना दिलासा दिला.
पिंप्री निर्मळ येथून सुरू होणाऱ्या बाह्यवळण रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत ग्रामस्थांनी प्रशासना विरोधात केलेल्या तक्रारींची दखल घेवून आ. विखे पाटील यांनी शनिवारी सार्वजनिक बांधकाम महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र राजगुरु, उपअभियंता अंकुश पालवे, अभियंता श्रीनिवास वर्पे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांना घेवून या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेची पाहाणी केली. पावसाने या रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. मुरुम टाकुन तात्पुरते खड्डे बुजविण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. परंतू निर्माण झालेल्या धुळीमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले. धुळीमुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून जनावरेही आता चारा खात नाहीत आशा तक्रारी ग्रामस्थांनी आ. विखे पाटील यांच्यासमोर मांडल्या या मार्गावरची वाहतूक अधिकारी थांबवत नसल्याचे सांगितले.
रस्त्याच्या कामासाठी आपण पाठपुरावा करून निधीस मंजूरी मिळवून आणली. परंतू सरकार निधीच देत नसल्याने काम सुरू होत नसल्याचे आ. विखे पाटील यांनी सांगितले. याबाबत अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली. रस्त्याच्या कामाची पाहाणी करीत असताना आ. विखे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. रस्त्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देत आ. विखे पाटील यांनी तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देवून मंत्री चव्हाण यांनी निधीची उपलब्धता करून कामालाही सुरूवात करण्याची ग्वाही दिली.
कामाला सुरूवात होईपर्यत ग्रामस्थांची आडचण दूर व्हावी म्हणून या रस्त्याची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याच्या सूचना आ. विखे यांनी पोलीस प्रशासनास दिल्या आहेत.