◻ फ्लेक्ससाठी नियमावली करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना.
संगमनेर Live | आज संगमनेर दौऱ्यावर असलेल्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी चक्क स्वतःचा नववर्ष अभिनंदनाचा फ्लेक्स उतरवून, हौशी कार्यकर्त्यांच्या अवैध बॅनरबाजीला कडाडून विरोध केला. यावेळी त्यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना बोलावून घेऊन फ्लेक्ससाठी नियमावली बनविण्याच्या सूचना केल्या आहेत.
संगमनेर मध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून भव्य बसस्थानक साकारले आहे. महाराष्ट्रातील देखण्या आणि भव्य बसस्थानकात याची गणना होती. मात्र या बसस्थानकाच्या समोर हौशी कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी केली जाते, त्यामुळे बसस्थानकाचे विद्रूपीकरण होते. महसूल मंत्री आज बसस्थानकासमोरून जात असताना त्यांच्या ही बाब लक्षात आली, शिवाय तेथे असलेल्या बॅनरवर त्यांचेच फोटो होते. त्यांनी गाडी थांबवून त्यांच्या फोटोचे फ्लेक्स तात्काळ उतरविण्याच्या सूचना सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना केल्या. त्यांच्या या कृतीने काही क्षण त्यांच्या सोबत असणारे कार्यकर्तेही गोंधळले, मात्र त्यांनी आग्रहाने सांगितल्यावर त्यांचे फ्लेक्स उतरवले गेले.
दरम्यान तो पर्यंत प्रमुख अधिकारी वर्ग तेथे पोहोचला होता. मंत्री थोरात यांच्या या कृतीचे अनुकरण करत तेथील छोटे मोठे बॅनर तात्काळ हटविण्यात आले. मंत्री थोरात यांनी, बॅनर्स लावण्याच्या संदर्भाने नियमावली करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. बसस्थानक व्यवस्थापकांना बोलावून दंडात्मक कारवाई करण्याचेही सुचविले. याशिवाय बसस्थानकावरील अवैध व बेशिस्त पार्किंगला आळा घळण्यासाठीही ठोस पावले उचलण्याचे आदेश दिले.
मंत्री ना. थोरात यांच्या या अनपेक्षित कृतीमुळे बसस्थानक परिसर अवैध बॅनर्स पासून मुक्त झाला. समाजातील सर्वच स्तरांतून या कृतीचे कौतुक होते आहे.