◻‘ पिवळ्या क्रांतीचे जनक ’ म्हणून महाराष्ट्राला ओळख.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक चे रहिवासी असलेले जेष्ठ सनदी अधिकारी आबासाहेब एकनाथराव जऱ्हाड याची नुकतीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सचिव म्हणून नियुक्ती झाल्याने संगमनेर तालुक्यासह आश्वी पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे.
आबासाहेब जऱ्हाड हे यापूर्वी मुंबई महानगर पालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व नारायण राणे यांचे सचिव याचबरोबर त्याना प्रशासकीय कामाचा दिर्घ अनुभव असल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ज्येष्ठ सनदी अधिकारी आबासाहेब एकनाथराव जऱ्हाड १९९७ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी सेल्स टॅक्स विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदी, तसेच मुख्यमंत्र्यांचे उपसचिव पदावर उल्लेखनीय काम केलेले आहे. त्यांची ठाणे जिल्हाधिकारीपदाची कारकीर्द विशेष लक्षणीय ठरली आहे. राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या ठाण्याचा सर्वागीण अभ्यास करत जिल्ह्यातील आदिवासीबहुल दुर्गम तालुक्यांमध्ये हळद शेतीला प्राधान्य देत व त्या उत्पादनाच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करुन देत त्यांनी आदिवासी समाजाला स्वयंपूर्ण व स्वावलंबी बनविण्यासाठी लक्षणीय कामगिरी केली आहे. याबद्दल त्यांना ‘ पिवळ्या क्रांतीचे जनक ’ असेही संबोधले जाते. हळद शेतीप्रमाणेच मोगरा व सोनचाफा लागवडीलाही त्यांनी प्राधान्य दिले.
जिल्हाधिकारी पदावरील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना बेस्ट कलेक्टर अवॉर्ड २०११- १२ ने सन्मानित करण्यात आले आहे. आबासाहेब जऱ्हाड यांच्या संकल्पनेतून साकारलेला नागरिकांचे श्रम व वेळ वाचविणारा व एकाच खिडकीवर विविध दाखले मिळवून देणारा ‘सेतू’ हा उपक्रम शासनामार्फत इंद्रधनू योजनेअंतर्गत संपूर्ण राज्यात राबविला गेला व त्याची दखल ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली आहे. त्याच्या याच कार्याची दखल घेत ठाकरे सरकारचे सचिव म्हणून नियुक्ती झाल्यानतंर ते आपल्या कामाचा ठसा पुन्हा प्रशासनात उमटवतील असा विश्वास आश्वी ग्रामस्थानी व्यक्त केला आहे.