◻ पाच जणांना अटक ; १० किलो मांस जप्त.
संगमनेर Live | केरळमधील इडुकीमध्ये घराजवळच्या शेतात टाकलेल्या जाळ्यात जंगलातून बाहेर आलेला जवळपास ५० किलो वजनाचा एक बिबट्या अडकला होता. वनविभागाला याची माहिती देण्याच्याऐवजी लोकांनी त्या बिबट्याला ठार केलं आणि त्यानंतर त्याचं मांस शिजवून खाल्लं. या धक्कादायक प्रकाराची माहिती समजताच पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असल्याची धक्कादायक बातमी न्युज 18 लोकमतने प्रसिद्ध केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
केरळमधील इडुकीमध्ये हा सर्व प्रकार असून या प्रकरणात वन विभागानं दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातल्या पाचही आरोपींची ओळख पटली आहे. विनोद, कुरिकोस, बीनू, कुंजप्पन आणि विन्सेट अशी या आरोपींची नावे आहेत. यामधील विनोदच्या शेतामधील जाळ्यात बिबट्या अडकला होता. त्यानंतर त्याने या सर्वाना बोलावून बिबट्याला ठार मारलं आणि त्याचं मांस शिजवून खाल्लं.
वन विभागाला या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी विनोदच्या घरात धाड टाकली. विनोदच्या घरातून १० किलो मांस आणि बिबट्याची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेलं शस्त्र देखील पोलिसांनी जप्त केलं आहे. बिबट्याची नखं, दात आणि कातडं विकण्याची या सर्व आरोपींची योजना होती.
या प्रकरणातल्या आरोपींचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. त्यांनी अटकेनंतर या सर्व प्रकारची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. बिबट्या हा संरक्षित प्राणी आहे. वन विभागच्या कायद्यानुसार या आरोपींना सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. संरक्षित वन्य प्राण्यांची अवैध पद्धतीनं शिकार करुन त्याची परदेशामध्येही तस्करी केली जाते.
या सर्व प्रकारामुळे गावात खळबळ उडाली आहे. केरळमधल्या इडुकीमधील जंगलातून बिबट्या जवळपासच्या परिसरात तसंच शेतामध्ये येण्याच्या घटना वारंवार घडतात. अनेकदा पिण्याचं पाणी पिण्याच्या उद्देशानं बिबट्या गावातील तळ्याजवळ येतो, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली असल्याचे न्युज 18 लोकमतने प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटले आहे.