◻ पाणी फाऊंडेशनच्या समृद्ध गाव योजनासाठी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांची कार्यशाळा संपन्न.
संगमनेर Live | नव्याने निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांकरता समृद्ध गाव योजना अधिक चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी पानी फाउंडेशन च्या माध्यमातून केले जात असलेले काम दिशादर्शक असून ही योजना नवनिर्वाचित सदस्यांनी अधिक प्रभावीपणे राबवल्याने गावे अधिक समृद्ध होतील असा विश्वास प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी व्यक्त केला असून तालुक्यातील सर्व सदस्यांसाठी ही कार्यशाळा संपन्न झाली.
संगमनेर प्रांताधिकारी कार्यालय येथे झालेल्या या एक दिवसीय कार्यशाळेसाठी प्रांत अधिकारी डॉ. शशिकांत मंगळूरे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे ,पाणी फाऊंडेशनचे विभागीय समन्वयक विक्रम फाटक, संदेश कारंडे, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, जलमित्र, गावकरी, शासकीय ग्रामसेवक, कृषी सहाय्यक सीसी जनसेवक अशा १०२ कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
यावेळी प्रातांधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे म्हणाले की, पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक असून पाणी अधिक जमिनीमध्ये मुरविल्याने त्या गावात समृद्धी येते. पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून राज्यभर झालेले काम हे संपूर्ण देशासाठी अनुकरणीय असून आता प्रत्येक गावोगावी हे काम अधिक चांगले जर झाले तर गावे समृद्ध होतील. गाव समृद्ध झाला तर राज्य समृद्ध होईल म्हणून नवनिर्वाचित सदस्यांसाठी ही एक चांगली संधी असून प्रत्येकाने अधिक सक्रियतेने काम करावे असे आव्हान त्यांनी केले.
गटविकास अधिकारी सुरेश शिंदे म्हणाले की, ग्रामपंचायत हा लोकशाही व्यवस्थेचा पाया आहे. तो अधिक सक्षमतेने चालवल्यास गावे विकसित होतील. यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून विविध योजना अधिक प्रभावीपणे राबवल्या गेल्या पाहिजे.
याप्रसंगी विक्रम फाटक यांनी विहिरीची पाणी पातळी चा रिपोर्ट समजावून सांगितला तर संदेश कारंडे यांनी पाणी फाउंडेशनच्या उपक्रमांची माहिती दिली. दरम्यान यावेळी अनेक जल मित्र व गावकऱ्यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर प्रत्यक्ष विहीर, बोरवेल गणना, हंगामनिहाय पिकांची माहिती प्रत्येकाला देण्यात आली.