सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवर तरुणाईने संघर्ष करावा - अण्णा हजारे.

संगमनेर Live
0
संगमनेर Live | आर्थिक सुरक्षा आणि स्वातंत्र्यासाठी मागील दोन महिन्यांपासून देशातील शेतकरी  रस्त्यावर उतरले आहेत. दुसरीकडे करोनाच्या लॉकडाउन कालखंडात देशातील बालविवाह-मुली आणि स्त्रियांवरील अत्याचार, तरुणांची बेरोजगारी व्यसनाधीनतेसह त्यांचे मानसिक आरोग्याचे वाढलेले जटील प्रश्न, यामुळे देशातील असंतोष शिगेस पोहोचला आहे, असे मत ज्येष्ठ गांधीवादी अण्णा हजारे यांनी आज व्यक्त केले. या परिस्थितीला प्रतिसाद देत समग्र व्यवस्था परिवर्तनासाठी अराजकीय स्वरूपाचा सत्याग्रह तरुणाईने छेडावा, असे आवाहन अण्णा हजारे यांनी तरुणाईला केले. 

अनाम प्रेम संस्थेच्या सत्यमेव जयते ग्राम प्रकल्पात २८ व्या श्रमसंस्कार छावणी चा प्रारंभ आज अण्णा हजारे यांच्या हस्ते झाला. यावेळी जेनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे जागतिक आरोग्य संघटनेसोबत  गेली २ दशके समर्पित कार्य करणाऱ्या सौ. सीमा उपळेकर, आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात पायाभूत योगदान देणारे पुणे येथील ज्येष्ठ कार्यकर्ते विनायकराव खंडकर, पाणी फाउंडेशन चे नगर आणि नाशिक जिल्ह्याचे प्रमुख विक्रम फाटक, महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचे माजी सदस्य संतोष शिंदे आदी उपस्थित होते. या सर्वांनी विविध सत्रात तरुणाईशी संवाद केला.

राज्यस्तरीय श्रम संस्कार छावणीत १६ जिल्ह्यातून २२७ युवा कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. तरुणाईला वाढते बालविवाह, मानसिक आरोग्य आणि समृद्ध गाव अभियान, या  विषयी च्या कार्यप्रेरणा देण्यासाठी संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आले. २६ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या छावणीत निम्मा दिवस सामूहिक श्रमदान केले जाते. छावणीत बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनीफ शेख, बाल हक्क कार्यकर्ते आणि लेखक हेरंब कुलकर्णी, रस्त्यांवरील भटक्या बेवारस मनोरुग्णांवर उपचार आणि पुनर्वसन करणाऱ्या स्नेह-श्रद्धा प्रकल्पाचे प्रमुख डॉ. निरज आणि सौ. दीप्ती करंदीकर, पर्यावरण तज्ञ डॉक्टर विश्वंभर चौधरी, अँँड. शाम असावा आदी तरुणाईशी संवाद करणार आहेत.

अनामप्रेम, अहमदनगर जिल्ह्याची  बाल कल्याण समिती, अहमदनगर चाईल्ड लाईन, बाल विवाह रोखण्यासाठी कार्यरत सर्व सामाजिक सामाजिक संस्थांचे उडान अभियान, श्रीगोंदा येथील विद्यार्थी सहाय्यक समिती, शेवगाव येथील उचल फाउंडेशन, कर्जत येथील स्नेहप्रेम आदी संस्थानी एकत्र येऊन  या शिबिराचे आयोजन केले आहे. सेवाकार्यात प्रत्यक्ष वेळ देण्याची तयारी असलेल्या आणि शिबिर सहभागासाठी ऑनलाईन आवेदन देणाऱ्या युवा कार्यकर्त्यांना  मुलाखत, संवाद अशा प्रक्रियेतून या शिबिरासाठी निवडले गेले. संपूर्ण राज्यात या बद्दलचा कृती कार्यक्रम या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राबविला जाणार आहे.

यावेळी सौ. सीमा उपळेकर यांनी अनुवादित केलेल्या मानसिक आरोग्य मार्गदर्शक या पुस्तकाचे विमोचन अण्णांच्या यांच्या हस्ते करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा अंतर्वेध घेणारे उडान, हे पुस्तक देखील या वेळी प्रकाशित करण्यात आले.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !