नगर शहरातील शिवभोजन केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांची ‘ सरप्राईज व्हिजीट ’

संगमनेर Live
0
जिल्हाधीकाऱ्यानी जेवणाचा दर्जा आणि व्यवस्थेचीही केली पाहणी.

संगमनेर Live | जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेन्द्र भोसले यांनी आज सकाळी अचानक महानगरपालिका क्षेत्रातील शिवभोजन केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. त्याचबरोबर, त्यांनी शिवभोजन केंद्रात जेवणासाठी येणार्‍या नागरिकांशी संवाद साधला आणि जेवण व्यवस्थित मिळते का, काही तक्रार नाही ना, याची विचारणा केली.
 

आज सकाळी कोरोना लसीकरण सरावफेरीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भोसले हे बाहेर पडले. महानगरपालिकेच्या तोफखाना नागरी आरोग्य केंद्राची पाहणी केल्यानंतर त्यांनी मोर्चा शहरातील शिवभोजन केंद्राकडे वळवला. तारकपूर येथील कृष्णा शिवभोजन केंद्रात ते दाखल झाले. तेथील अन्नपदार्थाचा दर्जा त्यांनी पाहिला. तेथील व्यवस्थापकाकडे विचारणा करुन नियमाप्रमाणे तेथे येणार्‍या नागरिकांना थाळी देण्यात येते का, याची माहिती घेतली. तेथे जेवण घेत असलेल्या नागरिकांशी त्यांची आस्थेवाईकपणे विचारणा करुन त्यांची ख्यालखुशालीही विचारली. 
 

अचानकपणे जिल्हाधिकारी स्वता:च शिवभोजन केंद्रात दाखल झाल्याने नागरिकही विस्मयचकित झाले. त्यांनी तेथे जेवणासाठी येणार्‍या नागरिकांशी थेट संवाद साधला. आपण कुठून येता, काय काम करता, येथे किती दिवसापासून येता अशी विचारणा डॉ. भोसले यांनी तेथे जेवणासाठी आलेल्या नागरिकांना केली. जेवणाच्या दर्जाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केल्याने जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनीही अशाच प्रकारे चांगले जेवण देत जा, अशी सूचना केंद्र चालकांना केली. तसेच, पार्सलद्वारे देण्यात येणार्‍या जेवणासाठी प्लास्टीक पिशव्या वापरु नये अशी तंबीही दिली.
 

याठिकाणी जेवणासाठी येणारे काही जण कामानिमित्त आलेले असतात तर काहींचे नातेवाईक रुग्णालयात दाखल आहेत, बाहेरचा खर्च परवडत नाही, म्हणून जेवणासाठी येथे येत असतात, असे या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांना आढळून आले. भोजनालय चालकाकडेही त्यांनी विचारणा केली. किती जण साधारणता दररोज येतात, किती पैसे घेता याची माहिती त्यांनी घेतली तसेच आलेल्या नागरिकांकडून ती पडताळूनही पाहिली.
 

अशाच प्रकारे शहर आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या शिवभोजन केंद्रांना आपण तसेच प्रशासनातील इतर अधिकारी वेळोवेळी भेटी देऊन नागरिकांना तेथे चांगल्या प्रकारचे जेवण मिळेल, यासाठी लक्ष ठेवू. शिवभोजन केंद्र चालकांनीही जेवणासाठी येणार्‍या नागरिकांची कोणतीही तक्रार राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !