संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथिल नानाभाऊ वाघमारे यांच्या वस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री सहा बिबट्यानी मिळून बंदीस्त गोठ्यात हल्ला करुन दोन शेळ्या मारल्या तर आरडाओरडा करणाऱ्या महिलेवर ही हल्ला केला परंतू ही महिला थोडक्यात बचावल्याने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दाढ खुर्द शिवारात गट नंबर १४३ मध्ये नानाभाऊ वाघमारे यांची वस्ती व बंदीस्त जनावराचा गोठा आहे. शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास वाघमारे वस्तीवर सहा बिबट्ये शिकारीच्या शोधात दाखल झाले होते. त्यामुळे शेळ्यानी मोठ्याने ओरडण्यास सुरवात केली. त्यामुळे नेमके काय झाले हे पाहण्यासाठी वाघमारे कुटुंबिये बाहेर आले असता दोन बिबट्ये गेट समोर, दोन बिबट्ये मागील बाजूला तर दोन बिबट्ये थेट आंब्याच्या झाडाचा आधार घेऊन बंदीस्त गोठ्यात शिरलेले दिसले. यावेळी बिबट्यानी दोन शेळ्या ठार करत एक शेळी उचलून गोठ्याबाहेर नेली. यावेळी बिबट्याना हुसकवण्यासाठी वाघमारे कुटुंबिय सरसावले असता बिबट्याने बबई वाघमारे या महिलेवर हल्ला केला. परंतू दैव बलवत्तर म्हणून महिलेची पंज्जा लागल्याने केवळ साडी फाटली मात्र महिला थोडक्यात बचावली. त्यामुळे वाघमारे कुटुंबियात मोठी दहशत निर्माण झाली.
यामुळे नानाभाऊ वाघमारे यानी स्थानिक नागरीकासह संगमनेर वनविभागालाा माहिती देण्यासाठी फोन केला असता वनविभागाच्या अधिकाऱ्यानी फोन उचलला नाही. त्यामुळे वाघमारे यांनी थेट वनमंत्री संजय राठोड याना फोन करुन घडलेल्या गंभीर घटनेची माहिती दिली. घटनेचे गाभिर्य ओळखत वनमंत्र्यानी थेट प्रशासकीय यंत्रणा हालवल्याने बिबट्याना पकडण्यासाठी पिजंऱ्यासह अधिकाऱ्याचा फौज फाटा रात्री २.३० वाजेच्या सुमारास वाघमारे यांच्या वस्तीवर दाखल झाला असून अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.
तर घटनेची माहिती मिळताच संजय भांड, राजेद्रं जमधडे, अविनाश जोशी, सतिष जोशी, सुधीर जोरी आदिसह स्थानिक ग्रामस्थं वाघमारे यांच्या वस्तीवर आले होते. यावेळी दहशतीखाली असलेल्या वाघमारे कुटुंबाला ग्रामस्थानी आधार दिला.
दरम्यान सहा बिबट्यानी मिळून हल्ला केल्याची संगमनेर तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील ही पहिलीचं घटना असण्याची शक्यता जाणकारानी वर्तवली असून कोणतीही मोठी दुर्दैवी घटना घडण्याआधी कळपात हल्ला करणारे हे सहा बिबट्ये जेरबंद करावे अशी मागणी दाढ खुर्द ग्रामस्थानी केली आहे.