संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील पानोडी येथिल ज्योती उर्फ अनिता सोमनाथ दिघे (वय - ३३) या विवाहित महिलेला माहेरावरुन पैसे आणावेत तसेच किरकोळ कारणावरुन पती सोमनाथ दिघे याने शुक्रवार (२७ फेब्रुवारी) रोजी दुपारी डोक्यात लोखंडी हत्याराने वार करत हत्या केली असून आरोपी पतीला पोलिसानी अटक केली आहे.
याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर मोहीम यांनी दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, पानोडी येथील सोमनाथ दिघे यांचा जामगाव (ता. गंगापूर) येथील जगन्नाथ मोहीम यांची मुलगी अनिता उर्फ ज्योती हीच्याशी १६ वर्षापुर्वी थाटामाटात लग्न झाले होते. त्याना दोन मुली व एक मुलगा आहे. सुरुवातीला दोन वर्ष दोघाचा संसार सुरळीत चालू होता. त्यानंतर किरकोळ कारणावरुन सोमनाथ दिघे हा बहिनीला शिवीगाळ व मारहाण करु लागला. तीन वर्षानी सोमनाथ दिघे याने गाय घेण्यासाठी पैशाची मागणी केली. घरची गरिबीची परिस्थिती असतानाही मुलीच्या संसारास कमतरता निर्माण होवू नये म्हणून वडीलानी घरची एक गाय पानोडी येथे पोहच केली होती. मात्र सोमनाथच्या अपेक्षा वाढू लागल्याने त्याने नविन मोटर सायकल घेण्यासाठी ५० हजाराची मागणी केली, परंतू घरची परिस्थिती गरिबीची असल्याने ती मागणी पूर्ण करु शकलो नाही.
सुमारे चार महिन्यापूर्वी सोमनाथ दिघे यानी फोनकरुन पैशाची मागणी केली व जामगाव येथे येऊन १० हजार रुपये घेऊन गेला होता. तर दिड महिन्यापूर्वी बहिण व मेव्हणे सोमनाथ दिघे हे माझ्या घरी आले होते, त्यावेळी मला लोकाची उधारी मिटवण्यासाठी ५० हजार रुपये द्या अशी मागणी केली. परंतू माझी परिस्थिती नसल्यामुळे मी पैसे देवू शकत नाही, असे म्हटल्यामुळे रागाने बहिणीला घेऊन पानोडी येथे निघुन आले होते.
दि. २७ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मी शेतात काम करत असताना पानोडी येथून संजय जाधव याचा फोन आला व मला बहिनीला भेटण्यासाठी लोणी येथिल दवाखान्यात बोलावले. दवाखान्यात आलो त्यावेळी बहिण मृत झालेली होती व त्यावेळी तिच्या डोक्यात मोठी जखम दिसली. तसेच चेहऱ्यावर मारहाण केल्याच्या खूना होत्या. त्यामुळे मेव्हणे सोमनाथ दिघे याने पैशासाठी बहिनीचा खून केल्याचे म्हटल्यामुळे गुरंव नं २७/२०२१ नुसार भादंवी कलम ३०२ प्रमाणे आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसानी आरोपी पतीला अटक केली असून न्यायालयात हजर केल्यानतंर आरोपीला सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील हे करत आहेत.
ज्योती उर्फ अनिता हिचा मृत्यू झाल्याची माहिती माहेराकडील नातेवाईकाना समजल्यानंतर आरोपीला अटक करावी यासाठी नातेवाईकानी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे घटनास्थळी पोलिस उपअधिक्षक राहुल मदने, पोलिस निरिक्षक सुधाकर मांडवकर, साहय्यक फौजदार तात्याराव वाघमारे, गुप्तवार्ता विभागाचे विनोद गंभीरे, हवालदार शिदें, रणधीर, पारधी, पो. ना. शेख, चालक पथवे आदि दाखल झाले होते. दरम्यान रविवारी दुपारी शोकाकूल वातावरणात पानोडी येथे मृत ज्योतीवर तणावपूर्ण वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले असून यावेळी पोलीसाचा फौजफाटा उपस्थित होता.