संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील साकूर - आश्वी रस्त्यावरील पानोडी घाट माथ्यावर रविवारी सायंकाळी लग्नाचे वऱ्हाड घेवून जाणाऱ्या टेम्पोला अपघात झाल्याने सहा जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास खांबे येथे लग्न आटपुन नवरदेवाकडील नातेवाईक नंबर नसलेल्या वऱ्हाडाच्या टेम्पोने राहाता तालुक्यातील रामपूर गावाकडे चालले होते. यावेळी पानोडी घाट माथ्यावरील वळणदार रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव वेगात असणारा टेम्पो रस्ता सोडून खडुयात जावून पलटी झाला. यामुळे टेम्पोत असलेल्या महिला, लहान मुले व तरुण होते.
अपघाताची माहिती मिळताचं श्री. गजानन महाराज शुगर लिमिटेडच्या कर्मचाऱ्यासह स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व तरुणानी घटनास्थळी धाव घेवून मदत केली. दरम्यान घटनेची माहिती मिळताचं आश्वी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सुधाकर मांडवकर यानी ही आपल्या सहकार्यासह तातडीने घटनास्थळी दाखल होवून अपघातग्रस्ताना मदत केली. या अपघातात सहा जणांना गंभीर रित्या मार लागल्याने त्यांना लोणी येथील प्रवरा रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती मिळाली असली तरी जखमीची नावे मात्र कळू शकली नाही.