काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा व उज्वल भविष्य असलेला समर्पित नेता गमावला.

संगमनेर Live
0
खा. राजीव सातव यांना महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांची श्रद्धांजली.


संगमनेर Live | काँग्रेस पक्षाचे युवा नेते, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अंत:करण पिळवटून टाकणारे आहे. तरुण वयातच देशपातळीवर नावलौकीक कमावलेला, लोकशाहीवर, काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा व उज्वल भविष्य असलेला समर्पित नेता आम्ही गमावला आहे, अशा शब्दात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

खा. राजीव सातव यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करून ना. थोरात म्हणाले की, खा. राजीव सातव यांचे काम मी जवळून पाहिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. पंचायत समिती सदस्य ते खासदार प्रत्येक जबाबदारी पार पाडत असताना गरीब, कष्टकरी जनता, तरूण व शेतकर्‍यांचे प्रश्न ते अत्यंत तळमळीने मांडत असत. आपल्या कामाच्या ताकदीवर ते कमी वयात देश पातळीवरच्या राजकारणात पोहचले. आमदार, खासदार म्हणून त्यांनी आपल्या कामाची वेगळी ओळख निर्माण केली होती. समाजिक राजकीय प्रश्नांची त्यांचा उत्तम जाण होती. विविध विषयांचा अभ्यास, संघटन कौशल्य, अभ्यासू, मनमिळावू, सर्वांनासोबत घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव होता.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष व त्यानंतर अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी तरुणांचे मोठे संघटन उभे केले. खासदार म्हणून संसदेत काँग्रेस पक्षाची भूमिका ते भक्कमपणे मांडत असत. कृषी कायद्याला तीव्र विरोध करत राज्यसभेत त्यांनी पक्षाची बाजू समर्थपणे मांडली. त्यांना तीनवेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. संविधान, लोकशाही व काँग्रेस विचारांसाठी संघर्ष करण्याची त्यांची तयारी असायची. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर काँग्रेस पक्षाची सर्वोच्च समिती असणाऱ्या काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्यपदी त्यांची निवडण करण्यात आली होती. राजीव सातव यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाची व काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. आम्ही सर्व या कठिण प्रसंगी सातव कुटुंबियांच्या सोबत असून त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याचे बळ त्यांना मिळो अशी ईश्वराकडे मी प्रार्थना करतो.

खा. राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून, राजीव तुमची मेहनत, संघर्ष कायम आठवणीत राहील असे ही ना. बाळासाहेब थोरात म्हणाले.

काँग्रेस पक्षाची मोठी हानी - डॉ. तांबे

काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत पाईक म्हणून राष्ट्रीय पातळीवर खा. राजीव सातव यांनी मोठी जबाबदारी सांभाळली. नामदार बाळासाहेब थोरात यांचा व खासदार राजीव सातव यांचा मोठा स्नेह होता. खासदार सातव हे सातत्याने संगमनेरला विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपस्थित राहिले आहेत. विविध भाषांवर प्रभुत्व, उत्तम संघटन कौशल्य, प्रभावी वकृत्व, यामुळे त्यांनी पक्षातील अत्यंत महत्त्वाच्या अशा राष्ट्रीय कार्यकारणी मध्ये मानाचे स्थान मिळवले होते. त्यांचे आपत्कालीन निधनाने राज्य व राष्ट्रीय पातळीवरील काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असल्याची दु:खद भावना नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !