◻ शिर्डी विधानसभा मतदार संघातील १५०० हून अधिक कोरोना योध्यांचा होणार सन्मान.
संगमनेर Live (शिर्डी) | ज्यांच्यावर जबाबदारी होती त्यांनी केवळ मुंबई पुरतेच निर्णय करुन, ग्रामीण महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून दिले. फक्त केंद्र सरकारकडुन मदतीच्या अपेक्षा करायच्या मग तुम्ही काय करणार.? मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्या समोर ठेवून घेतलेल्या निर्णयाचा कोणताही लाभ ग्रामीण महाराष्ट्राला होणार नसल्याचा थेट आरोप भाजपाचे जेष्ठनेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. मानवतेच्या दृष्टीकोनातून सरकारी यंत्रणेतील आधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोव्हीड संकटात केलेल्या निरपेक्ष कामामुळेच सामान्य माणसाला आधार वाटल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
शिर्डी विधानसभा मतदार संघात कोव्हीड केअर सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देणाऱ्या सरकारी वैद्यकीय आधिकारी, खासगी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहीका चालक, सफाई कामगार, आशा सेविका आणि नर्सिंग स्टाफचा कोव्हीड योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला.
आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने प्रातिनिधीक स्वरुपात हा कृतज्ञता कार्यक्रम संपन्न झाला. सेवा सप्ताहाच्या निमित्ताने भाजपाचे कार्यकर्ते कोव्हीड योध्यांना घरी जावून सन्मानित करणार आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला ७ वर्षे पुर्ण झाली. या पार्श्वभूमिवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा ही संघटन या उपक्रमातून गाव पातळीवर आरोग्य सेवांचे उपक्रम तसेच कोव्हीड योध्यांना सन्मानित करण्यात आले. शिर्डी विधानसभा मतदार संघातील आरोग्य, महसुल तसेच आशा वर्कर, अंगणवाडी सेविका या आशा एकुण १५०० हून अधिक कोरोना योध्यांना सन्मानित करण्यासाठी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने नियोजन करण्यात आले होते.
शिर्डी येथील साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात डॉक्टरांसह पोलिस आधिकारी, वैद्यकीय आधिकारी, नर्सिंग स्टाफ तसेच लॅब टेक्निशियन यांना आ. विखे पाटील यांच्या हस्ते शाल आणि कृतज्ञता सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, प्रतापराव जगताप, कैलास कोते, अभय शेळके, नितीन कोते,
अशोक गायके, सुजित गोंदकर, रवि कोते, स्वानंद रासणे, भाजयुमोचे सतिष बावके यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. पोलिस उपअधिक्षक संजय सातव, शिर्डी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी आधिकारी रविंद्र ठाकरे, डॉ. प्रितम वडगावे, डॉ. मैथीली पितांबरे यांच्यासह इतरही वैद्यकीय आधिकारी व आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, सफाई कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
राहाता येथील जिल्हा बॅकेच्या सभागृहात सर्व कोव्हीड योध्यांना सन्मानित केल्यानंतर आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारला ७ वर्षे पुर्ण होत आहेत. या सर्व कार्यकाळात देशाला बलशाली बनविण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतलेच, परंतू कोव्हीड संकटानंतर हा देश पुन्हा आत्मविश्वासाने उभा राहावा म्हणून सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेतले. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सरकारी आधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निरपेक्ष भावनेतून आणि मानवी दृष्टीने केल्यामुळेच सर्वाधिक लोकसंख्या असलेला भारत देश पुन्हा गतीने पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात ज्यांच्यावर जबाबदारी होती त्यांनी फक्त मुंबई पुरते निर्णय घेतले. ग्रामीण महाराष्ट्राकडे दुर्लक्षच केल्यामुळे आरोग्य सुविधा नागरीकांना मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या. आघाडी सरकारचे निर्णय फक्त कागदोपत्री झाले, महाराष्ट्र राज्य हे ऑक्सीजन निर्मीतीत अग्रेसर मानले जाते तरीही ऑक्सीजनसाठी केंद्र सरकारवरच अवलंबुन राहणारे आघाडी सरकार कोव्हीड संकट रोखण्यात अपयशी ठरले. सर्वाधिक रुग्ण आणि मृत्युची संख्या ही महाराष्ट्रात असल्याचे नमुद करुन आ. विखे पाटील म्हणाले की, या संकटात आघाडी सरकार ना सामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहीले ना कोणती मदत यांनी मिळवून दिली. मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून यांनी जे निर्णय घेतले त्याचा कोणताही लाभ ग्रामीण महाराष्ट्राला होणार नाही. त्यामुळेच आघाडी सरकार हे फक्त घोषणा करत राहीले. या राज्यातील जनतेला संकटाच्या खाईत लोटून देणाऱ्या तीनही पक्षांच्या नेत्यांना जनता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
आव्हानात्मक परिस्थितीत कोव्हीड योध्यांनी जिवावर उदार होवून केलेल्या कामामुळे आपल्या मतदार संघात कोव्हीड रुग्णांची संख्या आटोक्यात येण्यास मोठी मदत झाली असल्याचे आ. विखे पाटील यांनी आवर्जुन नमुद केले. राहाता येथील कार्यक्रमास गणेश कारखान्याचे चेअरमन मुकूंदराव सदाफळ, भाजपाचे उपाध्यक्ष रघुनाथ बोठे, डॉ. कैलास गाडेकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पिपाडा, सभापती भाऊसाहेब जेजूरकर, जिल्हापरिषद सदस्या सौ. कविता लहारे, बार असोशिएशनचे अध्यक्ष तेजस सदाफळ, अँँड. ऋषिकेश खर्डे आदि उपस्थित होते.