संगमनेर Live (सहदेव जाधव) | विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसात अंगावर वीज पडून अनिता उर्फ मुक्ताबाई संजय वणवे (वय - ४०) ही शेतकरी महिला मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (२९ मे) रोजी सायंकाळी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार गावच्या शिवारात घडली असून यावेळी या महिलेच्या चार शेळ्याही यामध्ये ठार झाल्या आहेत.
साकुर परिसरात शनिवारी सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण व विजेच्या कडकडाटास वादळी पाऊस पडला. वणवे घरापासून काही अंतरावर शेतात शेळ्या चारण्यासाठी घेऊन गेल्या होत्या. पाऊस सुरू होण्याआधी अचानक विजेचा कडकडाट झाला. याचवेळी अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच प्रातांधिकारी शशिकांत मंगरुळे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख, आदिनाथ गांधले, गणेश तळपाडे, सरपंच सुप्रिया मिसाळ, उपसरपंच दत्तात्रय वणवे, ग्रामसेवक विजय आहेर आदींनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून या महिलेच्या दुर्दैवी मृत्यूमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
 

