◻ साकुर येथे कोविड - १९ उपाययोजना बाबत आढावा बैठक.
संगमनेर Live | कोरोनाचा वेग मंदावला असला तरी धोका टळलेला नाही. त्यामुळे कोणीही निष्काळजीपणा करू नका. आपल्याला पूर्ण संगमनेर तालुका कोरोना मुक्त करायचा आहे. यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले असून कोरोना उपाय योजनांबाबत पठार भागातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.
साकुर येथील वीरभद्र लॉन्स येथे कोरोना उपाययोजनांबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, इंद्रजीत खेमनर, प्रांतअधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक सुरेश पाटील, अशोक हजारे, पांडुरंग सागर, सौ. ताराबाई धुळगंड, पंचायत समिती सदस्य किरण मिंडे यांसह पठार भागातील विविध गावांमधील सरपंच व विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नामदार थोरात म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये शहरांपेक्षा ग्रामीण भागात मोठी वाढ झाली आहे. याचे कारण ग्रामीण भागामध्ये मध्यंतरी झालेले समारंभ आहेत. ही वाढ आपल्याला पूर्णपणे थांबवायची आहे. सध्या संगमनेर तालुक्यामध्ये पन्नास गावे कोरोना मुक्त असून संपूर्ण तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी सर्वांना काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोना बाबत कोणतीही शीतलता बाळगू नका. तो कधीही परत होऊ शकतो. एक व्यक्ती बाधित झाली तर त्याचे कुटुंब बाधित होते आणि त्याचा संपूर्ण आर्थिक मानसिक व शारीरिक त्रास त्या कुटुंबाला होतो. म्हणून या संकटापासून दूर राहण्याकरता स्वतः सह कुटुंबीयांची काळजी घ्या. विनाकारण बाहेर फिरू नका. कोणते ही लक्षणे आढळले तर तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन स्वतःचे विलीनीकरण करा. यासाठी गावातील स्थानिक युवकांनी प्रशासनाला मदत करा.
आमदार डॉ. तांबे म्हणाले की, नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील कोरोणा वाढ थांबवण्यासाठी प्रशासन अत्यंत काळजीपूर्वक काम करत आहे. याला नागरिकांचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे. नवीन आलेल्या म्युकरमायकोसिसचा धोका मोठा आहे. यापासून स्वतःला वाचवण्यासाठी सर्वांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. याप्रसंगी नामदार थोरात यांनी पठार भागातील प्रत्येक गावातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन त्या गावातील कार्यकर्त्यांना सूचना केल्या.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकरराव खेमनर यांनी केले तर इंद्रजीत खेमनर यांनी आभार मानले आहेत.