◻ मंगळापूरच्या सरपंच व उप सरपंचाचे कोरोनामुक्तीसाठी एक पाऊल पुढे.
संगमनेर Live (अमोल मतकर)| मागील काही दिवसामध्ये संगमनेर तालुक्यात कोरोना बाधीताच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत होती. ग्रामीण भागातील १६ हजार ९६३, शहरी भागातील ४ हजार ९७६ असे एकूण २२ हजार ९३९ कोरोना ग्रस्त झाले तर १०१ रुग्णांचा यात मृत्यू झाला आहे. 
तालुक्यातील मंगळापूर गावातही कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढू लागल्यामुळे आतापर्यत १७६ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले. त्यामुळे गावातील स्थानिक प्रशासन आणि कोरोना मुक्ती ग्राम समितीने मिळून कोरोनाला हद्दपार करायचे ठरवले असून त्यासाठी सरपंच आणि उपसरपंच यांनी अनोखी शक्कल लढवली. कोरोनासंदर्भात प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळा आणि दोन वर्षे घरपट्टी भरणे टाळा.! त्यामुळे गावातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या अनोख्या उपक्रमाचे तालुक्यात कौतुक होत आहे.
संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली तशी कमीही होताना दिसत आहे. शुक्रवारी (दि. ४ जून) रोजी अवघे ४८ बाधीत रुग्ण संपूर्ण तालुक्यात आढळल्याने सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. प्रत्येक गावातील स्थानिक पातळीवर प्रशासनाने कठोर परिश्रम घेऊन ग्रामीण भागातील कोरोनाचे संक्रमण होण्यापासून थांबवण्यात यश मिळविले. 
संगमनेर शहरापासून अवघ्या ५ किलोमीटर अतंरावर असलेल्या मंगळापूर गावाने देखील अनोखी शक्कल लढवून कोरोनाला हारविण्याचे ठरवले आहे. त्यासाठी सरपंच आणि उपसरपंच यांनी सर्वांना बरोबर घेऊन विशेष मोहीम राबविण्याचे ठरविले. गावातील कोणत्याही घरातील एखादी व्यक्ती कोरोना बाधीत झाली असता. त्यांनी नियमांचे पालन केल्यास अशा व्यक्तीची पुढील दोन वर्षाची घरपट्टी सरपंच व उपसरपंच स्वतः भरणार असल्याचे मंगळापूरच्या सरपंच शुभांगी रमेश पवार यांनी सांगितले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरपेक्षा ग्रामीण भागातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली. ग्रामीण भागातील नागरिकांनी हलगर्जीपणा आणि उपचारासाठी केलेला दिरंगाईमुळे रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. अगदी कोरोनामुळे काही संसार उध्वस्त झाले आहेत. त्यात ग्रामीण भागातील स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन अनेक गावकऱ्यांनी आणि प्रशासनाने मिळून कोरोनाला हरविले. त्यासाठी प्रत्येक गावातील नागरिकांनी मंगळापूर गावसारखा आदर्श डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे असल्याचे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले.
नियम पाळा घरपट्टी टाळा..
घरातील सर्व लोकांची चाचणी लवकर करून घेणे (रिपोर्ट जमा करने), संशयित व्यक्ती ने स्वतःहून विलगीकरनात राहावे व जबाबदारी ने वागावे, घरातील जी एक व्यक्ती बाधीत आहे, त्याच घरातील दुसरी व्यक्ती बाधीत होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, संपर्कात आलेल्या व्यक्तीचे नावे स्थानिक प्रशासनाला कळवणे. असे निर्णय दि. ४ जूनपासून घेण्यात आल्याची माहिती सरपंच शुभांगी रमेश पवार व उपसरपंच लक्ष्मण नंदू भोकनळ यानी दिली आहे.
 

