◻ माझी वसुंधरा अभियान २०२१ मधून संगमनेर नगरपरिषदेची निवड.
संगमनेर Live | स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर व हरित संगमनेर ही संकल्पना राबवितांना नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगरपरिषदेने पर्यावरण पूरक केलेल्या प्रभावी कामांमुळे महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने दिला जाणारा माझी वसुंधरा अभियान २०२१ अंतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल संगमनेर नगर परिषदेला गौवरवण्यात आले आहे.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व पर्यटन विभागाच्या वतीने माझी वसुंधरा अभियान २०२१ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणार्या नगरपरिषद, नगरपालिका व गावांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री ना. अजित पवार, महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे, ग्रामीण विकास मंत्री ना. हसन मुश्रीफ ,पर्यावरण राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, सचिव मनिषा म्हैसकर आदी उपस्थित. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या पुरस्काराचा स्वीकार संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे व मुख्याधिकारी डॉक्टर सचिन बांगर यांनी केला.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश या निसर्गाच्या पंचतत्त्वांच्या जपवणूकीबद्दल राज्य सरकारच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे व नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगर परिषदेने स्वच्छ संगमनेर, हरित संगमनेर व सुंदर संगमनेर अंतर्गत राबविलेल्या विविध योजनांमुळे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी संगमनेर ची निवड झाली आहे. संगमनेर शहराने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, आर्थिक समृद्धी सह प्रगतशील शहर म्हणून राज्यात ओळख निर्माण केली आहे. निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन योजनेचा पाणीपुरवठा, गंगामाई घाट सुशोभीकरण, विविध रस्त्यांचे सुशोभीकरण, शहरात असलेल्या विविध बागा, स्वच्छतेला दिले जाणारे प्राधान्य, घंटागाडी, बंदिस्त गटारे, विविध ठिकाणचे सुशोभीकरण, परसबाग निर्मिती सुका व ओला कचराचे वर्गीकरण, कचर्यापासून गॅस निर्मिती अशा अनेक उपाययोजनांमुळे संगमनेर शहरात आरोग्यदायी वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने या शहराची निवड केली आहे .
या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यामध्ये आपण विविध दिवस साजरे करतो. हे दिवस फक्त शुभेच्छा देण्यासाठी साजरे न करता कृतिशीलता जपत काम केले पाहिजे. निसर्गाने जे आपल्याला दिले, ते प्रत्येकाने जपले पाहिजे. कोणीही निसर्गाचे वैभव नष्ट करू नका. वृक्षारोपण, संवर्धन, डोंगर-दर्या, समुद्र, झाडे, प्राणी ही निसर्गाची देण असल्याने महाराष्ट्र अधिक संपन्न व समृद्ध झाला आहे. ही जपण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या अशा अभियानामुळे महाराष्ट्राची स्वच्छतेकडे वाटचाल होणार असून यामध्ये काही गावांनी नव्हे तर प्रत्येक नागरिकांनी सहभाग नोंदवला पाहिजे. महाविकास आघाडी सरकार हे राज्यातील सामान्य जनतेसाठी काम करत असून आगामी काळात एक सुंदर व समृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आगामी काळामध्ये नागरिकांनी मोकळ्या जागेमध्ये, रस्त्यांच्या दुतर्फा ,जिथे शक्य असेल तिथे वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन केले पाहिजे. निसर्ग पूरक जीवन जगणे हे आता प्रत्येकाचे कर्तव्य बनले आहे.
महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, या अभियानामुळे स्वच्छता संस्कृती वाढीस लागणार आहे. यामध्ये अनेक शहरांनी व गावांनी भाग घेतला. यापुढे उर्वरित गावे व शहरे आहेत त्यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा व स्वच्छ महाराष्ट्रासाठी आपण सर्वांनी या अभिनव उपक्रमात सहभागी व्हावे.
यावेळी ग्रामीण विकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ, पर्यावरण राज्यमंत्री नामदार संजय बनसोडे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यावरण मंत्री नामदार आदित्य ठाकरे यांनी केले सूत्रसंचालन मनिषा म्हैसकर यांनी केले तर श्रीवास्तव यांनी आभार मानले.
दरम्यान संगमनेर नगरपालिकेला मिळालेल्या पुरस्काराबद्दल नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, सर्व नगरसेवक, नगरसेविका मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर सर्व विभागांचे अधिकारी या सर्वांचे राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, इंद्रजित थोरात, सत्यजित तांबे, रणजितसिंह देशमुख, माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ आदिनी अभिनंदन केले आहे.
पुरस्काराचे श्रेय सर्व संगमनेरकरांचे - सौ. दुर्गाताई तांबे
संगमनेर नगरपरिषदेने स्वच्छते करता राबवलेल्या विविध उपक्रमांमध्ये संगमनेर शहरातील सर्व नागरिकांनी सातत्याने सहभाग घेतला आहे. ना. बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगरपालिकेला उत्कृष्ट कामाबद्दल यापुर्वीही अनेक पुरस्कार मिळाले असून पर्यावरण दिनानिमित्त मिळालेल्या या पुरस्कारामुळे सर्वांनाच कामासाठी मोठे प्रोत्साहन मिळाले आहे. आगामी काळात अधिक जोमाने सर्व मिळून काम करत संगमनेर शहराचा वैभव आणखी वाढवतील असा विश्वास नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे यांनी व्यक्त केला आहे.