संगमनेर Live | बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंगळवारी सकाळी संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावातून पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर याच्या नेतृत्वाखाली रुटमार्च काढला होता. मुस्लिम बांधवानी बकरी ईद शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करीत साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या रूट मार्चची सुरुवात आश्वी पोलीस ठाण्यापासून झाली. हा रूट मार्च आश्वी बुद्रुक गावातील मुख्य बाजारपेठ, सोनार गल्ली, बस स्थानक, कुंभार गल्ली, चांदशहावली दर्गा या मार्गाने काढण्यात आला होता. कोरोना विषाणु संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर विनाकारण गर्दी करु नये, मास्कचा वापर करावा, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करावे या सूचना नागरिकांना रुटमार्च दरम्यान दिल्या जात होत्या. या रूट मार्च मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील यांचेसह पोलीस अंमलदार, पोलीस हवालदार व होमगार्ड सहभागी झाले होते.
दरम्यान करोना संकटात बकरी ईद साजरी करताना मुस्लिम बांधवांनी नियमांचे पालन करावे, तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोविड निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याचे पालन करून सण शांततेत साजरा करत पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच करोना संकट अद्याप टळलेले नसून, शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करीत मुस्लिम बांधवांनी साधेपणाने बकरी ईद साजरी करावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने यावेळी केले आहे.