◻ उपबाजार समितीत फ्लॉवर मार्केट सह विविध विकास कामांचा होणार शुभारंभ.
संगमनेर Live | जयहिंद लोकचळवळ, अमृत उद्योग समूह, सर्व सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सोळाव्या वर्षाच्या दंडकारण्य अभियानाचा प्रारंभ रविवार दि. ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वडगाव पान येथील उपबाजार समिती व पद्मावती डोंगर परिसरात महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात व मुख्य प्रवर्तक आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून यावेळी उपबाजार समितीत फ्लॉवर मार्केट सह विविध विकास कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती मार्केट कमिटीचे सभापती शंकर खेमनर व कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या दुरदृष्टीतून सुरु झालेल्या दंडकारण्य अभियानाची नोंद युनोने घेतली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाचे संवर्धन, वृक्षारोपन हे भावी पिढयांसाठी काळाची गरज बनली आहे. महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मागील १५ वर्षात तालुक्यातील विविध संस्था, विद्यालये, कार्यकर्ते नागरिकांच्या सहकार्यातून हे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. तालुक्यात कमी पाऊस, जास्त उन्हाळा असून ही सहकारी संस्थांनी दिलेल्या भागामध्ये वृक्षसंवर्धनाचे चांगले काम केले आहे. संगमनेर तालुका दुष्काळग्रस्त असूनही संपूर्ण तालुका हिरवा करण्याचा ध्यास प्रत्येक नागरिकांने घेतला पाहिजे.
रविवारी वडगाव पान येथील पद्मावती डोंगर, कानिफनाथ मंदिर परिसर येथे सकाळी ११ वा दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ होणार असून उपबाजार समितीत वृक्षारोपन, फ्लॉवर मार्केट शुभारंभ, वजन काटा शुभारंभ होणार आहे. यावेळी शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, दंडकारण्य अभियानाच्या प्रकल्प प्रमुख सौ. दुर्गाताई तांबे, सत्यजीत तांबे, रणजितसिंह देशमुख, इंद्रजित थोरात, अॅड. माधवराव कानवडे, सौ. सुनंदाताई जोर्वेकर, सौ. मिराताई शेटे, सौ. शरयुताई देशमुख आदिंसह सर्व जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक व अमृत उद्योग समूहातील अधिकारी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त नागरिक बंधु भगिनी उपस्थित रहावे असे आवाहन अमृत उद्योग समूह, कृषी उत्पन्न बाजार समिती, दंडकारण्य अभियान समिती,वन विभाग व वडगाव पान ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.