प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना बंद करा.

संगमनेर Live
0
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश.
 
संगमनेर Live (अहमदनगर) | जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवा, प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करुन उपाययोजना गतीने राबवा आणि कोरोना संसर्गास कारणीभूत ठरणाऱ्या आणि प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या आस्थापना बंद करण्याची कठोर कारवाई करा, असे निर्देश नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.
 
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या सातत्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील जिल्हास्तरीय अधिकारी आणि तालुकास्तरीय अधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हा प्रशासन करीत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, पल्लवी निर्मळ, जयश्री माळी, उर्मिला पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. पवार आदी जिल्हा मुख्यालय येथून तर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक हे तालुका स्तरावर उपस्थित होते.
 
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्ण संख्येत वाढ होत आहे. या रुग्णवाढीची कारणे शोधून तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक आहे, असे सांगून श्री. गमे म्हणाले, जिल्ह्यात गर्दी जमवणाऱ्या कार्यक्रमांवर त्या-त्या क्षेत्रातील प्राधिकरणांमार्फत स्थापन करण्यात आलेल्या पथकांमार्फत लक्ष ठेवले गेले पाहिजे. विविध ठिकाणची पथके तात्काळ कार्यरत करा तसेच ठिकठिकाणी नाकाबंदी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. ज्या आस्थापना कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करीत नाहीत, त्या बंद (सील) करण्याची कारवाई करा. कोणत्याही प्रकारे कोरोना संसर्ग पसरण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांना सवलत देऊ नका. रुग्णसंख्या या प्रमाणात वाढत राहिली तर त्याचा ताण आरोग्य यंत्रणेवर येणार आहे. त्यामुळे हा प्रादुर्भाव वेळीच आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करा, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
अनेक गावात सातत्याने रुग्ण आढळून येत आहेत. असे क्षेत्र प्रतिबंधित करण्याची गरज असून त्याठिकाणी आरटीपीसीआर चाचण्या केल्या जाव्यात. बाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील नागरिकांची तात्काळ चाचणी केली गेली तर संसर्ग आटोक्यात आणण्यास मदत होईल, असे सांगून श्री. गमे यांनी, तालुकास्तरीय यंत्रणांनी आता अधिक गतिमान होण्याची गरज व्यक्त केली.
 
जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. जिल्ह्याचा रुग्ण बाधित होण्याचा दर असाच वाढत राहिला तर जिल्ह्यात पुन्हा प्रतिबंध लावावे लागतील. त्यामुळे यंत्रणांनी कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील सर्वांना प्रोत्साहित करण्याचीम गरज आहे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांना कोरोना प्रतिबंधासाठी करावयाच्या कार्यवाहीची गरज पटवून द्या, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
जिल्ह्यात यापुढे गर्दी जमवणारे कार्यक्रम होणार नाहीत, याची दक्षता तालुकास्तरीय यंत्रणांनी घ्यावी. असे कार्यक्रम कऱणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.  जिल्हा रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबमध्ये पूर्ण क्षमतेने चाचण्या होतील यादृष्टीने आरोग्य यंत्रणेने कार्यवाही करावी. दररोज होणाऱ्या चाचण्या, बाधित आदींची माहिती संबंधितांनी दररोज पोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
 
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी, जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. सध्या संगमनेर, पारनेर, पाथर्डी, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव आदी ठिकाणी रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह गुरुवारपासून प्रादुर्भाव वाढलेल्या तालुक्यांचा पुन्हा दौरा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
ग्रामीण भागात चाचण्यांची संख्या वाढवणे, होम आयसोलेशन होणार नाही यासाठी हिवरे पॅटर्न अंतर्गत स्थापन कऱण्यात आलेल्या गावस्तरीय समित्यांना कार्यरत करणे,  प्रतिबंधात्मक क्षेत्रात कडक उपाययोजना राबविणे याला प्राधान्य दिले जात असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी दिली.
 
पोलीस विभागामार्फत कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन न करणाऱ्या व्यक्ती आणि आस्थापनांविरुद्ध दंडाची कार्यवाही केली जात आहे. मात्र, यापुढे सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्री. पाटील यांनी दिली.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !