संगमनेर Live (लोणी) | आदिवासी समाजातील विद्यार्थ्याना, शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी लोणी येथे सुमारे ८ कोटी रुपयांचे स्वतंत्र आदिवासी वसतीगृह उभारण्याचा निर्णय आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. उच्च शिक्षण घेणाऱ्या आदिवासी समाजातील विद्यार्थ्यासाठी या वसतीगृहाचा मोठा दिलासा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत देण्यात येणाऱ्या खावटी कर्ज योजनेतून मंजुर झालेल्या धान्य किटचे वितरण आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, सभापती सौ. नंदाताई तांबे, ट्रक्स सोसायटीचे चेअरमन नंदू राठी, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बर्डे, प्रकल्प आधिकारी संतोष ठुबे, पंचायत समिती सदस्य संतोष ब्राम्हणे, काळू रजपूत, संचालक संजय आहेर, रेवन्नाथ जाधव, उपसरपंच गणेश विखे, अनिल विखे, प्रकल्प समन्वयक आंबादास बागुल, सहाय्यक योगेश चोथवे आदिसह पदाधिकारी उपस्थित होते.
राहाता तालुक्यात २ हजार ५८ आदिवासी कुटूंबियांना खावटी कर्ज योजनेचा लाभ मिळाला आहे. तालुक्यात शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत असून, राज्यातही आपण अव्वल स्थानी असल्याचे नमुद करुन, आ. विखे पाटील म्हणाले की, आदिवासी समाजासाठी घरकुलांची निर्मीती हा आपला प्राधान्यक्रम असणार आहे. विविध गावांच्या ग्रामपंचायतींनी या बाबत प्रस्ताव करण्याचे आवाहन करुन, त्यांनी सांगितले की, या समाजातील विद्यार्थी आता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे लागतील. केंद्र सरकारने लागू केलेल्या या योजनांचा लाभ यासाठी मिळवून द्यावा लागेल. याचाच एक भाग म्हणून लोणी येथे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांकरीता ८ कोटी रुपयांच्या निधीतून वसतीगृह मंजुर झाले असून, लवकरच त्याची उभारणी पूर्ण होईल. या वसतीगृहाचा उपयोगही विद्यार्थ्यांना होवू शकेल असा विश्वास व्यक्त करताना प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांमधील वसतीगृहाची सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मोफत लसीकरण संपूर्ण देशात सुरु केले आहे. या लसींचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे असे सुचित करुन, आ. विखे पाटील यांनी सांगितले की, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही गावागावांमध्ये लसीकरणाबाबत सामाजिक प्रबोधन करुन, जास्तीत जास्त नागरीकांचे लसीकरण पूर्ण करुन घेण्यास त्यांनी सांगितले.
माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले की, खावटी योजनेची अंमलबजावणी येवढ्या मोठ्या संख्येने होत असल्याने आदिवासी कुटूंबिंयाना मोठा दिलासा मिळाला आहे. कोव्हीड संकटाच्या पार्श्वभूमिवर रोजगाराचे मोठे प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वपूर्ण निर्णयांमुळे देशातील नागरीकांना धान्याची उपलब्धता होवू शकली असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. याप्रसंगी प्रकल्प आधिकारी संतोष ठुबे, रेवन्नाथ जाधव, काळू रजपूत यांचेही यावेळी भाषणे झाली.