संगमनेर Live | पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या तळेवाडी फाटा येथे गुरुवारी दुचाकीच्या धडकेत कळपातील एका वानराचा मृत्यू झाला असून यावेळी दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाले आहेत. वानराच्या मृत्यूमुळे वन्यजीव प्रेमीतून हळहळ व्यक्त होत आहे.
सध्या वरुणराजाच्या कृपादृष्टीने महामार्गाच्या दुतर्फा असलेला निसर्ग फुलला असल्याने भक्ष्य आणि पाण्याच्या शोधात जंगली श्वापदे सतत महामार्ग ओलांडत असतात. मात्र, वाहनांची मोठी रहदारी असल्याने भरधाव वेगातील वाहनांची वन्यजीवांना धडक बसते. यापूर्वी अनेकदा वाहनांच्या धडकेत बिबट्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वन्यजीवांचे संवर्धन करण्यासाठी वन विभागाने विविध उपाययोजना केलेल्या आहेत. तरी देखील वन्यजीव पाणी आणि भक्ष्याच्या शोधात इतरत्र फिरत असतात.
गुरुवारी देखील चंदनापुरी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या तळेवाडी फाटा येथे वानरांचा कळप जात होता. त्याचवेळी घारगावकडून संगमनेरच्या दिशेने येणार्या दुचाकीची जोराची धडक बसली. यामध्ये कळपातील एक वानर जागीच ठार झाले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी प्रवास करणार्यांनी वाहने थांबवून गर्दी केली होती. या अपघाताची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अरविंद गिरी यांसह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. तसेच वन विभागाचे वनपाल रामा माने, वनरक्षक जी. आर. कडनर, वनमजूर दत्तात्रय थिटमे दाखल झाले.
दरम्यान या मृत वानराचे चंदनापुरी घाटातील निसर्ग परिचय केंद्रात शवविच्छेदन करुन अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश आखाडे यांनी दिली असून या वानराच्या अपघाती मृत्यूमुळे वन्यजीव प्रेमीतून हळहळ व्यक्त होत आहे.